Join us  

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली येताच शास्त्री गुरुजींचं टेंशन वाढलं?

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:46 AM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणं तेवढं शिल्लक आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत असलं तरी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं टेंशन वाढलं आहे. कारण, गांगुली आणि शास्त्री यांच्यातील वाद हे जगजाहीर आहेत आणि बीसीसीआयची सूत्र गांगुलीच्या हाती गेल्यानंतर शास्त्रींच्या एकाधिकारशाहीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीसीसीआयनं नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीत पूर्वी गांगुलीचा समावेश होता आणि त्यानं शास्त्रींच्या प्रशिक्षकपदी निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यात शास्त्रींनीही एका कार्यक्रमात गांगुलीवर टीका केली होती. दादानंही त्याला सडेतोड उत्तर दिले होते. एका कार्यक्रमात शास्त्रींनी सांगितले होते की,'' 2007 साली बांगलादेश दौऱ्यावर असताना मी संघाचा व्यवस्थापक होतो. तेव्हा गांगुलीला सोडून निघून गेलो होतो. मला नऊ वाजता संघाची बस घेऊन निघायचे होते आणि मी वेळेचा पक्का आहे. गांगुली उशीरा आला आणि तेव्हा त्याला सोडून आम्ही निघून गेलो.'' त्यावर गांगुलीनंही त्याचवर उत्तर दिले. तो म्हणाला,''तुम्ही शास्त्रींची मुलाखत सकाळी घेऊ नका. ते नक्की काय बोलतात, हे त्यांनाच कळत नाही. जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा याबाबत विचारले होते. माझ्या माहितीत असं कधी घडलेलं नाही. त्यामुळे शास्त्रींची मुलाखत संध्याकाळी घ्या, तेव्हा ते नीट उत्तर देतील.''

 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर अनिक कुंबळेंना कर्णधार विराट कोहलीसोबत झालेल्या मतभेदानंतर प्रशिक्षकपदाचा राजीनाम द्यावा लागला होता, तेव्हा कोहलीनं शास्त्रींना हे पद देण्याची मागणी केली होती. गांगुली याच्या विरोधात होता, पण सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीला माघार घ्यावी लागली. गांगुलीनं नेहमी शास्त्रींच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीची निवड म्हणजे शास्त्रींचं तणाव वाढवणारी घटना, अशी चर्चा रंगली आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीरवी शास्त्रीबीसीसीआय