नवी दिल्ली : दिनेश कार्तिकला कदाचित अखेरच्या वेळी भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे, पण त्यामुळे त्याच्यावर कुठलेही दडपण नाही. भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून वेळेवर मिळालेल्या सल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अलीकडे केलेल्या चांगल्या कामगिरीचा लाभ घेण्यास तो प्रयत्नशील आहे.
संजू सॅमसन व ऋषभ पंत यांच्यासारख्या युवा यष्टिरक्षक फलंदाजांव्यतिरिक्त अनुभवी पार्थिव पटेलच्या उपस्थितीमुळे कामगिरीत सातत्य राखावे लागणार असल्याची कार्तिकला कल्पना आहे. तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात आहे. कारण महेंद्रसिंह धोनीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आताही नंबर एकची पसंती आहे.
सध्याचा फॉर्म लक्षात घेता कार्तिक वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत चौथ्या क्रमांकावर नियमितपणे स्थान पक्के करण्यासाठी दावेदार आहे. मनीष पांडे दुखापतग्रस्त झाल्यामुळे जून महिन्यात कार्तिकने चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले होते. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान त्याला संधी मिळाली नाही, पण त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या वन-डे मालिकेत त्याला संधी मिळाली.
संघातील पुनरागमनाबाबत विचारले असता कार्तिक म्हणाला,‘कदाचित (संघातील अखेरचे पुनरागमन) असू शकते, पण मी त्यादृष्टीने बघत नाही. जर तुम्ही असा विचार केला तर तुमच्यावर अतिरिक्त दडपण येते. न्यूझीलंडविरुद्ध वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरीमुळे मी समाधानी आहे. भविष्यात पुन्हा संधी मिळाल्यानंतर कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील राहील.’