Join us  

IPL 2020 : राशिद खान पुन्हा बँग ऑन टारगेट, मैत्री जपणारा मित्र म्हणूनही 'ग्रेट'

आयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करुन 12 पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. डेल स्टेनने 94 सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकात 12 पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 11:34 AM

Open in App
ठळक मुद्देआयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करुन 12 पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. डेल स्टेनने 94 सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकात 12 पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत.

ललित झांबरे 

तो प्रत्येकवेळी आपल्या 'टारगेट'वर कायम असतो, भरकटत नाही. कोणत्याही कर्णधाराला आपल्या संघात तो असायलाच हवा असे वाटावे असा हा खेळाडू आहे, अशा शब्दात ज्याचे 'ग्रेट' सुनील गावसकर (Sunil Gavaskar)  यांनी कौतुक केले आहे, त्या अफगाणी (Afganistan)  फिरकी गोलंदाज राशिद खानने (Rashid Khan) आणखी एक दमदार कामगिरी केली. त्याने किंग्स इलेव्हनवरील (Kings XI)  विजयात गुरुवारी 4 षटकात फक्त 12 धावा देत तीन गडी बाद केले. त्यात एकावेळी सनरायजर्सच्या (SRH)  छातीत धडकी भरवणाऱ्या निकोलस पूरनच्या विकेटचाही समावेश होता. शिवाय त्याने निर्धाव षटकही टाकले आणि त्यात विकेटही काढल्या. 

आयपीएलमध्ये आपल्या कोट्याची पूर्ण चार षटके गोलंदाजी करुन 12 पेक्षा कमी धावा देणाऱ्या कामगिरीच्या डेल स्टेनच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. डेल स्टेनने 94 सामन्यांमध्ये चार वेळा गोलंदाजीत पूर्ण चार षटकात 12 पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत. राशिद खानने हिच कामगिरी 52 सामन्यातच म्हणजे स्टेनपेक्षा जवळपास निम्म्याच सामन्यात केली आहे. स्टेनएवढे 94 सामने खेळलेला असेल तेंव्हा ही कामगिरी तो कुठवर नेईन सांगता येत नाही. 

पंजाबविरुध्द त्याने आपले शेवटचे षटक निर्धाव टाकताना त्या एकाच षटकात दोन गडीसुध्दा बाद केले. राशिदपासून नॉन स्ट्रायकयरला लांब ठेवण्यासाठी निकोलस पुरनने सलग चार चेंडूवर धाव घेतली नाही आणि पाचव्या चेंडूवर थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू कोलला. याप्रकारे पूरन 37 चेंडूत 77 धावा काढत बाद झाला आणि सामना सनरायजर्सच्या हातात आला. पुढल्याच चेंडूवर त्याने मोहम्मद शामीलाही पायचित पकडले.आपला गोलंदाजीचा कोटा संपला नाहीतर कदाचित त्याने हॅट्ट्रीकही केली असती. 

यंदाच्या आयपीएलमध्ये धावांची बरसात होत असताना त्याने आपल्या 24 षटकात फक्त 4.83 च्या दराने धावा दिल्या आहेत यावरुन तो किती नियंत्रित मारा करतोय, फलंदाजांना कसा जखडून ठेवतोय ते दिसुन येईल. आयपीएलमध्ये निर्धाव षटकात एकापेक्षा अधिक विकेट काढणाऱ्या प्रवीण कुमार, लसिथ मलिंगा, हरभजनसिंग आणि संदीप शर्मा यांच्या पंक्तीत तो आता जाऊन बसलाय.

आपले हे यश त्याने अलीकडेच अपघातात मृत्युमूखी पडलेला आपला मित्र अफगाणी फलंदाज नजीब तरकाई याला समर्पित केले आहे. तो आमचा अतिशय चांगला मित्र होता. त्याचे अपघाती निधन अशा बातम्या ऐकल्यावर फार मोठा धक्का बसतो असे त्याने म्हटले आहे.  

टॅग्स :IPL 2020अफगाणिस्तानसनरायझर्स हैदराबाद