Join us  

चेतेश्वर पुजाराचे शतकांचे अर्धशतक; पटकावले दिग्गजांच्या पंक्तित स्थान

न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीतील खमका फलंदाज चेतेश्वर पुजारानं ऐतिहासिक शतक झळकावलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 5:25 PM

Open in App

न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीतील खमका फलंदाज चेतेश्वर पुजारानं ऐतिहासिक शतक झळकावलं. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजारानं शतकांचे अर्धशतक साजरे केले. पुजारानं कर्नाटकच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे पन्नासावे शतक ठरले. यासह त्यानं सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या पंक्तित स्थान पटकावले.

प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रचे दोन्ही सलामीवीर 33 धावांवर माघारी परतले. स्नेल पटेल ( 16) आणि एच पटेल ( 13) यांना सुचिथ जे यांनी बाद केले. त्यानंतर पुजारा आणि शेल्डन जॅक्सन यांनी सौराष्ट्रचा डाव सावरला. पुजारानं 238 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार खेचून 162 धावा केल्या, तर शेल्डन 191 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 99 धावांवर खेळत आहे. पुजाराची ही खेळी विक्रमी ठरली. सौराष्ट्रनं दिवसअखेर 2 बाद 296 धावा केल्या आहेत.

अॅलिस्टर कूक ( 65), वासीम जाफर ( 57) आणि हाशिम आमला ( 52) यांच्यानंतर क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंत पुजारा शतकांचे अर्धशतक साजरा करणारा चौथा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 42 शतकांसह पुजाराच्या मागे आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नावावर अनुक्रमे 34 व 32 शतकं आहेत. पुजारानं मागील 13 डावांमध्ये 94.50 च्या सरासरीनं 945 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 352 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यानं 2012-13च्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नाबाद 352 धावा केल्या होत्या. कर्नाटकविरुद्धच्या यापूर्वीच्या सामन्यातही त्यानं नाबाद शतक झळकावले होते. 

भारतीयांमध्ये सर्वाधिक प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतकं सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर ( प्रत्येकी 81) यांच्या नावावर आहेत. त्यानंतर राहुल द्रविड ( 68), विजय हजारे ( 60), वासीम जाफर ( 57), दिलीप वेंगसरकर ( 55) , व्ही व्ही एस लक्ष्मण ( 55), मोहम्मद अझरुद्दीन ( 54) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :चेतेश्वर पुजारारणजी करंडकसचिन तेंडुलकरसुनील गावसकरराहूल द्रविडविराट कोहलीअजिंक्य रहाणे