रणजी करंडक स्पर्धेतील प्लेट ग्रुप लढतीत गोवा संघातील दोन फलंदाजांनी एका डावात त्रिशतकी खेळीसह खास विक्रमाची नोंद केलीये. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात गोव्याकडून खेळणाऱ्या स्नेहल कौठणकर आणि कश्यप बाकले या दोघांनी त्रिशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात दोन फलंदाजांनी त्रिशतक झळकवण्याची ही दुसरी वेळ आहे. याशिवाय या दोघांनी रणजी करंडक स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
डाव घोषित केल्यामुळे वाचला संगकारा अन् जयवर्धनेचा वर्ल्ड रेकॉर्ड
स्नेहल आणि कश्यप जोडीनं ६०६ धावांची नाबाद भागीदारी केली. गोवा संघाने २ बाद ७२७ धावांवर आपला डाव घोषित केला. जर गोवा संघानं डाव घोषित केला नसता तर या जोडीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग लावला असता. यासाठी फक्त १९ धावा कमी पडल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावे आहे. या दोघांनी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोलंबोच्या मैदानात ६२४ धावांची भागीदारी रचली होती.
दोघांनी नाबाद त्रिशतकासह केली हवा
अरुणाचल प्रदेशच्या संघाला अवघ्या ८४ धावांवर आटोपल्यावर गोवा संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. १२ धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर १२१ धावांवर दुसरी विकेट गेली. त्यानंतर स्नेहल आणि कश्यप जोडी जमली. कश्यपनं २६९ चेंडूत ३९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३०० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला स्नेलनं २१५ चेंडूचा सामना करताना ४५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ३१४ धावांची खेळी केली.
याआधी कधी कुणी केली होती अशी कामगिरी?
याआधी १९८९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात दोन फलंदाजांनी त्रिशतक झळवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी गोवा संघा विरुद्ध खेळताना तमिळनाडूच्या वुर्केरी वेंकट रमण आणि कृपाल सिंह या दोघांनी एका डावात ट्रिपल सेंच्युरी ठोकल्याचे पाहायला मिळाले होते.