मुंबई - बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला. यानंतर, हिमाचल प्रदेशचा दुसरा डाव ४९.१ षटकांत १३९ धावांत गुंडाळत मुंबईने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने या विजयासह बोनस गुणाची कमाई करत गटात अव्वल स्थान पटकावले.
मुंबईच्या या शानदार मुशीर खानचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. त्याने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दोन्ही डावांत मिळून ३ बळी घेतले. तसेच, शम्स मुलानीने दुसऱ्या डावात ३७ धावांत ५ बळी घेत हिमाचलच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
सलामीला जम्मू-काश्मीरविरूद्ध दुसऱ्या डावात आणि यानंतर छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावातही शम्सने प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ गारद केला होता. त्याने चारपैकी तीन सामन्यांत ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. दुसऱ्या डावात हिमाचल प्रदेशला सुरुवातीपासूनच धक्के बसले. पुखराज मान याने १०२ चेंडूंत ९ चौकारांसह ६५ धावांची एकाकी झुंज दिली. इतर फलंदाजांना मात्र मुंबईकरांपुढे तग धरता आला नाही.
मुशीर खानने २, तर कर्णधार शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हिमाचल प्रदेशच्या दुसऱ्या डावात खेळपट्टीने फलंदाजांची परीक्षा घेतली. चेंडूंना अनपेक्षितरीत्या मिळणाऱ्या उसळीचा फायदा घेत मुंबईकरांनी दबदबा राखला.
त्याआधी, ७ बाद ९४ धावांवरून सोमवारी खेळण्यास सुरुवात केलेल्या हिमाचलचा डाव १८७ धावांत संपुष्टात आला. हिमांशू सिंगने ३ आणि तुषार देशपांडे व शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. निखिल गांगटा (६४*) आणि वैभव अरोरा (५१) यांनी मुंबईकरांना झुंजवले. वैभवने आक्रमक फटकेबाजी करताना आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. मुंबईने दिवसभरात एकूण १३ बळी घेत वर्चस्व राखले.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १३७.२ षटकांत सर्वबाद ४४६ धावा.
हिमाचल प्रदेश (पहिला डाव) : ६५.५ षटकांत सर्वबाद १८७ धावा (निखिल गांगटा नाबाद ६४, वैभव अरोरा ५१, पुखराज मान ३४; हिमांशू सिंग ३/५४, तुषार देशपांडे २/२३, शम्स मुलानी २/५४.)
हिमाचल प्रदेश (दुसरा डाव) : ४९.१ षटकांत सर्वबाद १३९ धावा (पुखराज मान ६५, निखिल गांगटा २३; शम्स मुलानी ५/३७, मुशीर खान २/२३.)