हैदराबाद - एकतर्फी राहिलेल्या सामन्यात मुंबईने रविवारी हैदराबादचा ९ गड्यांनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुंबईकरांनीरणजी करंडक स्पर्धेतील ड गटात बोनस गुणाची कमाई करत ३० गुणांसह आपले अव्वल स्थान भक्कम केले. पहिल्या डावात तडाखेबंद द्विशतक झळकावणारा मुंबईचा सरफराज खान सामनावीर ठरला.
हैदराबादने दिलेले अवघ्या १० धावांचे लक्ष्य मुंबईने ३.२ षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात बाद केले. त्याआधी, ७ बाद १६६ धावांवरून खेळण्यास सुरुवात केलेल्या हैदराबादचा दुसरा डाव ६९.५ षटकांत ३०२ धावांत संपुष्टात आला. मुंबईने पहिल्या डावात २९३ धावांची आघाडी घेतल्यांनतर हैदराबादवर फॉलोऑन लादला होता. चमा मिलिंदने हैदराबादचा डावाने होणारा पराभव टाळताना १२८ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला नितिन साई यादव (३२) आणि कर्णधार मोहम्मद सिराज (३२) यांच्याकडून दमदार साथ लाभली. मुंबईकडून मुशीर खानने शानदार मारा करताना ७९ चेंडूंत ५ बळी घेतले. मोहित अवस्थीने ३ बळी घेतले. उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केल्यानंतर मुंबई आता आपला अखेरचा साखळी सामना २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान खेळेल. हा सामना बीकेसी येथील एमसीए मैदानावर रंगेल.
संक्षिप्त धावफलक :
- मुंबई (पहिला डाव) : १२३.२ षटकांत सर्वबाद ५६० धावा.
- हैदराबाद (पहिला डाव) : ८२.२ षटकांत सर्वबाद २६७ धावा.
- हैदराबाद (दुसरा डाव) : ६९.५ षटकांत सर्वबाद ३०२ धावा (चमा मिलिंद ८५, कोदिमेला हिमतेजा ४३, राहुल सिंग ३३; मुशीर खान ५/७९, मोहित अवस्थी ३/४७.)
- मुंबई (दुसरा डाव) : ३.२ षटकांत १ बाद १० धावा (आकाश आनंद नाबाद ५, अखिल हेरवाडकर ४, हिमांशू सिंग नाबाद १; नितिन साई यादव १/६.)