मुंबई - बलाढ्य मुंबईनेरणजी करंडक स्पर्धेत आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गुरुवारी कट्टर प्रतिस्पर्धी दिल्ली संघाविरूद्ध पहिल्याच दिवशी पकड मिळवली. दिल्लीचा पहिला डाव ७६.४ षटकांत २२१ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबईने पहिल्या दिवसाअखेर ३ षटकांत १ बाद १३ धावा अशी सुरुवात केली. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने दिल्लीच्या फलंदाजीला हादरे देताना ६२ धावांत ५ बळी घेतले.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अखिल हेरवाडकर (४*) आणि तुषार देशपांडे (०*) खेळपट्टीवर होते. बीकेसी येथील एमसीए मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईकरांनी दिल्लीच्या फलंदाजीला धक्के दिले. दिल्लीने पाचव्या षटकात पहिला बळी गमावल्यानंतर १ बाद १११ धावा अशी दमदार सुरुवात केली. परंतु, शम्स मुलानीने वैभव कंडपाल याला बाद करून सनत संगवान-वैभव यांची जमलेली जोडी फोडली आणि येथून दिल्लीच्या फलंदाजीला गळती लागली. सनत-वैभव यांनी १९९ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. अवस्तीने दिल्लीच्या मधल्या फळीला सुरूंग लावताना आर्यन राणा (१०), कर्णधार आयुष डोसेजा (०) आणि सुमित माथुर (२) यांना बाद केले. यामुळे दिल्लीकर दडपणात आले.
सलामीवीर सनत याने मुंबईकरांना कणखरपणे सामना केला. त्याने २१८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११८ धावा केली. वैभवने ८६ चेंडूंत ३ चौकारांसह ३२, तर यष्टिरक्षक-फलंदाज प्रणव राजवंशीने ९० चेंडूंत ६ चौकारांसह ३९ धावा केल्या. मोहितच्या भेदकतेसह तुषार देशपांडे आणि शम्स यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले. यानंतर, मुंबईलाही यष्टिरक्षक-फलंदाज आकाश आनंदच्या (४) रूपाने झटपट धक्का बसला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली (पहिला डाव) : ७६.४ षटकांत सर्वबाद २२१ धावा. (सनत सांगवान ११८, प्रणव राजवंशी ३९, वैभव कंडपाल ३२; मोहित अवस्थी ५/६२, तुषार देशपांडे २/३६, शम्स मुलानी २/४५.) मुंबई (पहिला डाव) : ३ षटकांत १ बाद १३ धावा (अखिल हेरवाडकर खेळत आहे ४, आकाश आनंद ४, तुषार देशपांडे खेळत आहे ०; दिविज मेहरा १/४.)