नवी दिल्ली : गतविजेता विदर्भ तसेच इशान्येकडील सात नव्या संघांसह विक्रमी ३७ संघांचा समावेश असलेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. प्रशासकीय हालचालींना वेग आला असताना स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे अवघड आव्हान बीसीसीआयपुढे असेल. सामन्यांसाठी ५०हून अधिक मैदानांचा वापर होणार आहे.
मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, नागालँड, मेघालय, बिहार आणि पाँडिचेरी या नव्या संघांसाठी ‘लाल चेंडू’ला यशस्वीपणे सामोरे जाण्याचे आव्हान राहील. या संघांना रणजी चषकात थेट न खेळविता अन्य स्पर्धांचा अनुभव घेऊ द्यावा, असा काहींचा तर्क होता. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकांच्या समितीने मात्र नव्या संघांना थेट प्रवेश दिला आहे. नवे संघ प्लेट गटात एकमेकांविरुद्ध खेळतील. यातील अनेक संघ यंदाच्या मोसमात बाहेरच्या राज्यातील खेळाडूंची मदत घेत आहेत. सामने आयोजनात आपली यंत्रणा सज्ज असल्याचे बीसीसीआयचे क्रिकेट संचालन महाव्यवस्थापक सबा करीम यांचे मत आहे. करीम म्हणाले, ‘आमची यंत्रणा सज्ज आहे. याआधीही हजारे, दुलीप व देवधर करंडकाच्या आयोजनाचे काम केले आहे.’