Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सौराष्ट्र’कडे प्रथमच रणजी करंडक; डावाची आघाडी घेत बंगालवर मात

ऐतिहासिक कामगिरी : उनाडकट विजयाचा शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 01:38 IST

Open in App

राजकोट : जयदेव उनाडकटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने रणजी करंडकाचे शुक्रवारी पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी बंगालवर पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ वर्षांत सौराष्ट्रने तब्बल चारवेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, चारही वेळा त्यांना अपयश आले. अखेर बंगालविरुद्ध सौराष्ट्रने जेतेपदाचा दुष्काळ संपविला.

पहिल्या डावात सौराष्ट्रने ४२५ धावांचा डोंगर उभा केला. घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळणाºया सौराष्ट्रने बंगालच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अर्पित वसवदाचे शतक आणि त्याला चेतेश्वर पुजारा-अवी बारोट-विश्वराज जडेजा या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी करीत दिलेली उत्तम साथ या जोरावर सौराष्ट्रने पहिल्या डावावर वर्चस्व गाजविले. बंगालच्या गोलंदाजांनी सुरुवातीला प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. अंतिम सामन्याची खेळपट्टी अतिशय खराब असल्याची टीका बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी केली होती. पहिल्या डावात बंगालकडून अक्षदीपने ४, शाहबाज अहमदने ३, मुकेश कुमारने २, तर इशान पोरेलने एक बळी घेतला.

बंगालच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. तिसºया स्थानावर आलेला सुदीप चॅटर्जी, मधल्या फळीतील रिद्धिमान साहा, अनुस्तुप मुजुमदार यांनी अर्धशतके ठोकून बंगालची झुंज सुरू ठेवली. या फलंदाजानी काही चांगले फटके खेळले. मात्र, मोक्याच्या क्षणी या फलंदाजांना बाद करण्यात सौराष्ट्रला यश आले. १) वेगवान गोलंदाज उनाडकट याने मजुमदारला पायचित आणि आकाशदीप याला धावबाद करीत तीन चेंडूंत दोन गडी बाद केले. यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. उनाडकटने या सत्रात १३.२३च्या सरासरीने सर्वाधिक ६७ गडी बाद केले. मात्र, सर्वकालीन विक्रम नोंदविण्यासाठी त्याला एक बळी कमी पडला. त्याने अखेरचा फलंदाज ईशान पोरेल याला पायचित करीत बंगालचा डाव संपुष्टात आणला.२)बंगालला १९८९-९० नंतर पहिले जेतेपद पटकाविण्याची संधी होती. मात्र, उपविजेते राहिलेल्या बंगालसाठी हे सत्र चांगले ठरले. वेगवान गोलंदाज आणि अनुभवी फलंदाजांनी बंगालला ३० वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते.३)कोरोनाच्या भीतीमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये पाचव्या दिवसाचा खेळ झाला. तरीही सौराष्ट्रच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करीत स्टेडियम दणाणून सोडले.

टॅग्स :रणजी करंडक