केरळविरुद्ध रणजी ट्रॉफी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भ संघातील स्टार बॅटर करुण नायर याच्या भात्यातून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आणखी एक धमाकेदार आणि लक्षवेधी खेळी पाहायला मिळाली. विदर्भ संघ दबावात असताना फायनलमध्ये त्याने शतकी खेळी केलीये. शतक झळकवल्यावर त्याने जे सेलिब्रेशन केले त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. यंदाच्या देशांतर्गत हंगामातील त्याच्या भात्यातून आलेले हे नववे शतक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खास अंदाजात सेलिब्रेशन
केरळ विरुद्धच्या लढतीत शतक झळकावल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून त्याने आनंद साजरा केला. त्यानंतर बॅट हेल्मेट बाजूला ठेवून तो फायनल मॅचमध्ये कितवे शतक मारले ते हातवारे करून दाखवतानाचा सीन पाहायला मिळाला. वनडे फॉर्मेटमध्ये ५ आणि टेस्ट फॉर्मेटमध्ये ४ असा इशारा त्याने करून दाखवला. त्याचा हा अंदाजही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसह तो टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे. आता पुन्हा एकदा त्याने BCCI निवडकर्त्यांना आपल्यातील धमक दाखवून देणारी खेळी केलीये. आता तरी बीसीसीआय निवडकर्ते त्याच्यासाठी टीम इंडियाचा दरवाजा उघडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
पहिल्या डावात साधला असता डाव, पण रनआउट झाल्यामुळे हुकली संधी
विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील अंतिम सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात सुरु आहे. पहिल्या डावातही त्याने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. पण रोहनसोबत ताळमेळाच्या अभावामुळे ८६ धावांवर त्याने आपली विकेट गमावली. मात्र दुसऱ्या डावात पुन्हा तो पहिल्या डावाप्रमाणेच अगदी लयबद्ध खेळताना दिसले. एवढेच नाही केरळच्या संघासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी त्याने शतकही ठोकले. २०२४-२५ च्या हंगामात त्याच्या भात्यातून निघालेले हे नववे शतक आहे. यातील पाच शतकेही विजय हजारे स्पर्धेतील ५० षटकांच्या स्पर्धेतील आहेत. तर ४ शतके ही रणजी स्पर्धेतील आहेत.