Mohammed Azharuddeen Century, Ranji Trophy 2025: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर केरळ आणि गुजरात संघांमधील रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केरळ संघ मजबूत स्थितीत आहे. केरळकडून मोहम्मद अझरुद्दीनने शानदार शतक झळकावले. तर कर्णधार सचिन बेबी आणि सलमान निजार यांनी अर्धशतके झळकावली. या रणजी ट्रॉफीमध्ये शतक करणारा अझरुद्दीन हा केरळचा फक्त दुसरा फलंदाज आहे. याशिवाय, त्याने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली.
अझरुद्दीनने शतक ठोकून रचला इतिहास
उपांत्य सामन्यात केरळचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने शानदार शतक झळकावले. अझरुद्दीनने १७५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अझरुद्दीनने शतक पूर्ण करताच संपूर्ण डगआउटने त्याच्या खेळीचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या. यासह, मोहम्मद अझरुद्दीनने इतिहासात आपले नाव नोंदवले. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अझरुद्दीनने जी कामगिरी केली, ती आतापर्यंत केरळच्या कोणत्याही फलंदाजाला करता आली नव्हती. रणजी उपांत्य फेरीत शतक करणारा तो केरळचा पहिला फलंदाज ठरला. त्याने सलमान निजारसोबत सहाव्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. अझरुद्दीनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. याशिवाय त्याने ११ अर्धशतकेही झळकावली आहेत.
सचिन बेबी, सलमान निजार यांचीही अर्धशतके
उपांत्य सामन्यात मोहम्मद अझरुद्दीनने शतक झळकावले, तर कर्णधार सचिन बेबीनेही शानदार फलंदाजी केली. केरळच्या संघाने फक्त ८६ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या, तेव्हा सचिन बेबीने अर्धशतकी खेळी करत संघाला सावरले. त्याने १९५ चेंडूंत आठ चौकारांसह ६९ धावा केल्या. दुसरीकडे सलमान निजार यानेही अर्धशतक ठोकले. गुजरातकडून अर्जन नागवासवालाने दोन तर रवी बिश्नोई आणि प्रियजितसिंग जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.