रणजी करंडक स्पर्धेतील पुनरागमनाच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल मुंबई संघासाठी संकटमोचक ठरला. राजस्थानविरुद्धच्या एलिट ग्रुप ‘डी’ सामन्यात मुंबईच्या संघावर धावा नव्हे तर डावांनी पराभूत होण्याचं संकट घोंगावत होते. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी  करत राजस्थानच्या ताफ्यातून द्विशतक झळकवणाऱ्या दीपक हुड्डाच्या द्विशतकावर पाणी फेरलं. जैस्वालच्या खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाच्या खेळात मुंबई संघ सामना अनिर्णित राखून पराभव टाळण्यात यशस्वी ठरला.
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
मुंबईचा संघ संकटात असताना यशस्वीनं ठोकली कडक सेंच्युरी
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या  राजस्थान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालनं ९७ चेंडूत ६७ धावांची खेळी केली.  त्याच्याशिवा मुशीर खान याने केलेली ४९ धावांची खेळी वगळता अन्य कोणत्याही मुंबईकराला बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली नाही. परिणामी मुंबईचा पहिला डाव अवघ्या २५४ धावांत आटोपला. मुंबईच्या संघाला थोडक्यात आटोपल्यावर राजस्थानच्या संघाने  दीपक हुड्डाचं २४८ (३३५) द्विशतक आणि कार्तिक शर्माच्या १३९ (१९२) शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ६ बाद ६१७ धावा करत मुंबईच्या संघाला बॅकफूटवर ढकलले होते. राजस्थानकडे ३६३ धावांची भक्कम आघाडी असल्यामुळे मुंबईच्या संघावर धावांनी नव्हे तर डावांनी पराभूत होण्याचं संकट घोंगावत होते. पण IPL चं घरचं मैदाना असलेल्या मैदानात यशस्वी जैस्वालची बॅट तळपली अन् मुंबईच्या संघाला मोठा दिलासा मिळाला. 
रणजीत गाठला मैलाचा पल्ला
मुंबईसाठी संकटमोचक ठरलेल्या यशस्वी जैस्वाल याने या शतकी खेळीसह एक मोठा डाव साधला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १७ व्या शतकासह त्याने रणजी क्रिकेटमध्ये  १००० धावांचा टप्पाही पार केला. २१ डावांत त्याने हा मैलाचा पल्ला गाठला आहे. २०१९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी रणजी पदार्पण करणाऱ्या जैस्वालनं ११ सामन्यांत जवळपास ५४ च्या सरासरीसह धावा काढल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठीही ठोकला शड्डू
रणजी सामन्यात यशस्वीनं दोन्ही डावात धमक दाखवत आगामी दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या दिल्ली कसोटी सामन्यात त्याच्या बॅटमधून १७५ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. मुंबईचा संघ संकटात असताना  त्याने आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवून देताना १७४ चेंडूत १५६ धावांची खेळी केली. कामगिरीतील सातत्य दाखवून देत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी शड्डू ठोकल्याचे दिसून येते.