Join us

Ajinkya Rahane : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे रणजी करंडक स्पर्धेत खेळणार, अर्जुन तेंडुलकरचीही मुंबईच्या संघात निवड

टीम इंडियातील आपली जागा पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या निर्धाराने कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:37 IST

Open in App

टीम इंडियातील आपली जागा पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या निर्धाराने कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) रणजी करंडक स्पर्धेत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या संघात अजिंक्यचा समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्या नेतृत्वाखाली अजिंक्यला रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागणार आहे. १७ फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याचाही मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत  रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या होत्या. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते. रहाणेनं २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याने  मागील १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेसह चेतेश्वर पुजारा यांना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिला होता.

गांगुली म्हणाला होता की,''ही दोघं खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी करंडक स्पर्धेत ही दोघं खेळून खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही. तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी. त्यांनी आधीही रणजी करंडक स्पर्धा खेळली आहे. ''

मुंबईचा रणजी संघ - पृथ्वी शॉ ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे ( यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.

रणजी करंडक स्पर्धेची रुपरेषा

  • १० फेब्रुवारीला रिपोर्टींग 
  • १० ते १४ फेब्रुवारी क्वारंटाईन
  • १५ व १६ फेब्रुवारी सराव
  • १७ ते २० फेब्रुवारी पहिल्या फेरीचे सामने
  • २४ ते २७ फेब्रुवारी दुसऱ्या फेरीचे सामने 
  • ३ ते ६ मार्च तिसऱ्या फेरीचे सामने
  • ७ ते १० मार्च उप उपांत्यपूर्व फेरीपूर्वी क्वारंटाईन
  • ११ मार्च सराव
  • १२ ते १६ मार्च उप उपांत्यपूर्व फेरीचे सामने
टॅग्स :अजिंक्य रहाणेरणजी करंडकअर्जुन तेंडुलकरपृथ्वी शॉ
Open in App