भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नंतर पाच दिवसांनी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला.
यूपी टी२० लीगच्या यूट्यूब चॅनलवर राजीव शुक्ला यांच्यासोबतचा एक पॉडकास्ट शेअर करण्यात आला. या पॉडकास्टमध्ये राजीव शुक्ला यांना सचिन तेंडुलकरप्रमाणे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकदिवसीय क्रिकेटमधून निरोप देण्यात येईल का? असे विचारण्यात आले. यावर राजीव शुक्ला म्हणाले की, "रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबद्दल चर्चा करणे योग्य नाही. "
पुढे राजीव शुक्ला म्हणाले की, "बीसीसीआयचे धोरण आहे की, खेळाडूने स्वतः निवृत्तीचा निर्णय घ्यावा. बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्यास सांगत नाही आणि खेळाडू जो काही निर्णय घेईल, त्याचा आदर केला जातो. पूल येईल, तेव्हाच ठरवता येईल की, त्याला कसे ओलांडून पुढे जायचे. विराटचा खूप फीट आहे. रोहित शर्मा अजूनही चांगला खेळतो. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची काळजी आताच करण्याची गरज नाही." राजीव शुक्ला यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा कोणताही विचार करत नाहीत.