Rajat Patidar Duleep Trophy RCB Win: दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सेंट्रल झोनने शानदार कामगिरी केली आणि साऊथ झोनचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह त्यांनी दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दुलीप ट्रॉफी जिंकण्यासाठी सेंट्रल झोनला शेवटच्या डावात अवघ्या ६५ धावांची आवश्यकता होती. त्यांनी अवघ्या ४ विकेट्स गमावून सामना जिंकला. यश राठोड हा दुलीप ट्रॉफीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने सेंट्रल झोनकडून १९४ धावांची शानदार खेळी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, RCB संघाला पहिले विजेतेपद मिळवून देणारा रजत पाटीदार हाच सेंट्रल झोनचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबी पाठोपाठ सेंट्रल झोनलाही विजेतेपद मिळाले.
सेंट्रल झोनला ११ वर्षांनी विजेतेपद
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, साऊथ झोन संघ पहिल्या डावात फक्त १४९ धावांवर ऑलआउट झाला. फिरकी गोलंदाज सारांश जैनने ५ आणि कुमार कार्तिकेयने ४ बळी घेतले. नंतर सेंट्रल झोनने पहिल्या डावात ५११ केल्या. यात कर्णधार रजत पाटीदारने १०१ तर यश राठोडने १९४ धावांची खेळी केली. सारांश जैननेही ६९ धावा केल्या. दुसऱ्या डावात, दक्षिण विभागाने ४२६ धावा केल्या. यात अंकित शर्माने ९९ आणि आंद्रे सिद्धार्थने ८४ धावा केल्या. पण अखेर मध्य विभागाच्या संघाने सामना सहज जिंकला.
यश राठोड, सारांश जैन विजयाचे शिलेदार
पहिल्या प्रयत्नात द्विशतक हुकलेल्या यश राठोडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सेंट्रल झोनचा अष्टपैलू सरांश जैनला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. सारांश जैनने या स्पर्धेत १३६ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या. कर्णधार रजत पाटीदारनेही स्पर्धेत ठसा उमटवला. त्याने ३ सामन्यांमध्ये ७६ पेक्षा जास्त सरासरीने ३८२ धावा केल्या. यश राठोडने स्पर्धेत १२४ पेक्षा जास्त सरासरीने ३७४ धावा केल्या. तर दानिश मालेवारनेही ३ सामन्यांमध्ये ७० पेक्षा जास्त सरासरीने ३५२ धावा केल्या.
Web Title: Rajat Patidar won Duleep Trophy as captain for Central Zone after RCB IPL 2025 triumph
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.