इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या सामन्यातील पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन कोल्टर-नायल ( Nathan Coulter-Nile ) याने दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत कोल्टर-नायलला दुखापत झाली होती. RRने तो सामना ६१ धावांनी जिंकला होता. SRHविरुद्धच्या सामन्यात त्याला षटकही पूर्ण करता आले नव्हते आणि दुखापतीने त्याने मैदान सोडले. रियान परागने ते षटक पूर्ण केले.
दरम्यान, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) रोमहर्षक सामन्यात
राजस्थान रॉयल्सवर ( RR) ४ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला. ५ बाद ८७ अशा धावसंख्येवर असताना दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) व शाहबाज अहमद हे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडले. या दोघांनी ३३ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी करून RCBला गमावलेला सामना जिंकून दिला.
या पराभवानंतरही राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात २, तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना खाते उघडताच आलेले नाही.