Join us

रायुडूमुळे मधली फळी स्थिर होईल : कोहली

अंबाती रायुडू याने चौथ्या स्थानावर सातत्याने धावा काढून संघात स्थान पक्के केल्यास मधल्या फळीला स्थिरता लाभेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 02:28 IST

Open in App

गुवाहाटी : अंबाती रायुडू याने चौथ्या स्थानावर सातत्याने धावा काढून संघात स्थान पक्के केल्यास मधल्या फळीला स्थिरता लाभेल. यामुळे विश्वचषकाआधी मधल्या फळीतील समस्येवर तोडगा निघेल, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन-डेपूर्वी व्यक्त केला. या स्थानासाठी अनेकांना संधी दिली; पण एकही फलंदाज आमच्या पसंतीस उतरलेला नाही, असे सांगून कोहली म्हणाला, ‘रायुडूला विश्वचषकाआधी अधिक संधी देण्याची गरज आहे.’ यूएईत झालेल्या आशिया चषक सामन्यात रायुडूने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करीत १७५ धावा केल्या होत्या. याशिवाय महेंद्रसिंह धोनी कुठल्याही स्थानावर खेळण्यास सज्ज असल्याचे सांगून कोहलीने झहीर खान, तसेच नेहरा यांच्या निवृत्तीनंतर संघात आलेला युवा डावुखरा गोलंदाज खलील अहमद याच्या समावेशाचे स्वागत केले. डावखुरा वेगवान गोलंदाज संघात राहिल्याने गोलंदाजीत विविधता राहील, असे कोहली म्हणाला.>मालिका अटीतटीची होईल : होल्डरला विश्वासभारत-विंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सहा दिवसांत आटोपल्यानंतर वन-डे मालिकाही एकतर्फी होण्याची क्रिकेटतज्ज्ञांनी भीती व्यक्त केली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने मात्र वन-डे मालिका अटीतटीची होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पत्रकारांशी बोलताना होल्डर म्हणाला, ‘वन-डे मालिका इतकी सहज होणार नाही. भारत सर्वोत्कृष्ट संघ असला तरी आमच्या युवा संघात अनेक नवे चेहरे आहेत. सर्वांना प्रतिभा सिद्ध करण्याची संधी असेल. सामने जिंकण्यासाठी आम्हाला ३०० वर धावा कराव्या लागतील.सातत्याने हा आकडा गाठल्यास भारतावर दडपण आणणे सोपे जाईल. भारतात वेगाने धावा निघत असल्याने आमच्या फलंदाजांना धावा काढण्यावर भर द्यावाच लागेल.’ २०० वा वन डे खेळणार असलेल्या मर्लोन सॅम्युअल्सचे कौतुक करीत होल्डर म्हणाला,‘सॅम्युअल्स आमच्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. मी पाहिलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंपैकी तो परफेक्ट असून २०० व्या सामन्यात तो कमाल करेल, असा विश्वास वाटतो.’

टॅग्स :विराट कोहली