Join us  

द्रविडची कल्पकता भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची

टीम इंडियाने गाजवले पाच वर्षांपासून वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:46 AM

Open in App

अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर 

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी गेल्या काही वर्षांत भारताने क्रिकेटमध्ये गाजविलेल्या वर्चस्वाचे श्रेय राहुल द्रविडला दिले आहे. द्रविडने ऑस्ट्रेलियन पद्धत समजून घेतली आणि आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करीत भारतीय क्रिकेटच्या विकासात हातभार लावला. अंडर-१९ व भारत ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारा द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे.

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. गेल्या आठवड्यात आयसीसीच्या जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत त्याची प्रचिती येते. न्यूझीलंड दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या, तर काही महिन्यांपूर्वी भारतासोबत अव्वल स्थानाच्या शर्यतीत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

काही आठवड्यांचा कमी-जास्त विचार करता भारतीय संघ जवळजवळ गेल्या पाच वर्षांपासून अव्वलस्थानी आहे. ही उल्लेखनीय कामगिरी आहे. केवळ कसोटीच नव्हे, तर भारताने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविले आहे. भारताची भिस्त उपलब्ध प्रतिभावान खेळाडूंवर अवलंबून आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियाची अशीच स्थिती होती. १९८० च्या दशकात वेस्ट इंडिजनेही जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले. दोन दशकांनंतर किंवा पॅकर सिरीजनंतर वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अस्ताला प्रारंभ झाला, पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट मात्र बलाढ्य होत गेले. विंडीज क्रिकेट हे नैसर्गिक गुणवत्तेवर आधारित आहे. त्याला इंग्लिश कौंटीची जोड मिळाली होती.

कॅरेबियन द्वीपसमूहाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जास्त नाही. ऑस्ट्रेलियाने पायाभूत सुविधा उभ्या करीत क्रिकेटचा विकास केला. त्यात अकादमी, प्रतिभा शोध आदींचा समावेश आहे. चॅपेल यांनी म्हटल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियात प्रतिभेची वानवा नाही; पण ती शोधून काढण्याची योग्य पद्धत हवी. याचा विचार केल्यानंतर भारतीय क्रिकेट सध्या का वरचढ आहे, याचे उत्तर मिळते. याचे श्रेय बीसीसीआयला द्यायलाच हवे. त्यांनी देशभर क्रिकेटच्या विकासासाठी योजना राबविली. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेत त्यांचा पूल तयार केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमुळे प्रतिभावान खेळाडूंना पैलू पाडण्यास मदत झाली. दोन दशकांपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजे केवळ दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी रिहॅबिलिटेशन केंद्र होते; पण आता अकादमीचे कार्य केवळ तेवढ्यावर मर्यादित राहिलेले नाही.

द्रविडने अकादमीची कार्यक्षमता वृद्धिंगत करताना महत्त्व वाढविले. त्याने भारतीय क्रिकेट बळकट करण्यावर भर दिला. त्याने चॅपेल यांच्या मताप्रमाणे केवळ ऑस्ट्रेलियन पद्धतीचा वापर केला नाही, तर  खेळाडू व अंडर-१९ व भारत अ संघाचा प्रशिक्षक म्हणून आलेल्या अनुभवाचा कल्पक वापर केला. त्यात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, युवा खेळाडूंमध्ये बेदरकार वृत्ती निर्माण करणे याचा समावेश आहे.

टॅग्स :राहूल द्रविड