Join us  

अन्वय द्रविड अन् आर्यवीर सेहवाग... क्रिकेटच्या मैदानात दोघं आमनेसामने, कोण ठरलं वरचढ?

राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची पुढची पिढीदेखील क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी सज्ज आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 6:46 PM

Open in App

Anvay Rahul Dravid vs Aryavir Virender Sehwag : राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग ही भारतीय क्रिकेटमधील मोठी नावे आहेत. सध्या टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या द्रविडला 'द वॉल' या नावाने ओळखले जाते. तो चिवट पद्धतीची फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध होता. याउलट वीरेंद्र सेहवाग त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जात होता. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून बराच काळ लोटला आहे. मात्र भारताच्या देशांतर्गत स्पर्धेत पुन्हा एकदा द्रविड आणि सेहवाग यांची नावे चर्चेत आली आहे. त्याचे कारण या दोघांची मुलं १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एकमेकांविरोधात उभी ठाकली आहेत.

अन्वय द्रविड vs आर्यवीर सेहवाग ...

विजय मर्चंट ट्रॉफीचे सामने सध्या सुरू आहेत. यात अंडर-16 स्पर्धेत कर्नाटकचा सामना दिल्लीशी आहे. कर्नाटकचे नेतृत्व राहुल द्रविडचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड करत आहे. तर सेहवागचा मुलगा आर्यवीर हा दिल्लीकडून खेळत आहे. या तीन दिवसीय सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी कर्नाटक संघाने फलंदाजी करताना ५६.३ षटकांत १४४ धावा केल्या आणि डाव संपुष्टात आला. द्रविडचा मुलगा अन्वय या डावात काहीही करू शकला नाही. त्याला आयुष लाक्राने दोन चेंडूत शून्यावर बाद केले. दुसऱ्या डावातही त्याला आयुष लाक्रानेच ११ धावांवर बाद केले.

वीरेंद्र सेहवागच्या मुलाने मात्र दमदार कामगिरी केली. त्याने ओपनिंग करताना शानदार अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवशी ५० धावा करून तो नाबाद परतला. आर्यवीर दुसऱ्या दिवशी बाद झाला. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह ५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दिल्लीचा संघ कर्नाटकवर भक्कम आघाडी घेताना दिसत आहे. अशा स्थितीत पहिल्या दोन दिवसांच्या लढतीत आर्यवीर हा अन्वयच्या तुलनेत वरचढ ठरताना दिसला.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यावर तो चर्चेत आला होता. तसेच आता द्रविड आणि सेहवागच्या मुलांनीही आपल्या खेळाने चर्चेत येण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :राहुल द्रविडविरेंद्र सेहवाग