Join us  

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव 'विराट'सेनेच्या डोळ्यात अंजन घालणारा, राहुल द्रविड

वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत पराभवाची चव चाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:02 PM

Open in App

मुंबई : विजयरथावर स्वार होत वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत पराभवाची चव चाखवली. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेतील हा पराभव भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल, असे स्पष्ट मत भारतीय संघाचा महान फलंदाज राहुल द्रविडनं व्यक्त केले. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असेही तो म्हणाला.

भारतीय संघ मालिकेत 2-0 अशा आघाडीवर होता, परंतु ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक करताना पाच सामन्यांची वन डे मालिका 3-2 अशी जिंकली. कर्णधार विराट कोहलीवर घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची नामुष्की प्रथमच ओढावली. 30 मेपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. ''आपल्याला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये जायचे आहे आणि वर्ल्ड कप घेऊन यायचा आहे, असे मत व्यक्त केले जात होते. असे झाले तर चांगलेच होईल. पण, या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे आपल्याला वर्ल्ड कपमध्ये आणखी चांगला खेळ करावा लागेल, याची जाण करून दिली,'' असे मत द्रविडने व्यक्त केले.

तो पुढे म्हणाला,''ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. मागील काही वर्षांतील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये आपल्याला जायचे आहे आणि वर्ल्ड कप घेऊन यायचा आहे, अशा चर्चा आहेत. पण, वर्ल्ड कप इतका सोपा नसेल, हे ध्यानात असूद्या. पण, ऑसीविरुद्धच्या पराभवाचे आश्चर्य वाटलेले नाही. आताही आपण जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत.'' 

23 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंवर अतिरिक्त ताण पडणार आहे. याबाबत द्रविड म्हणाला,''ही तारेवरची कसरत कशी पार करावी, हे अनेक खेळाडूंना माहित आहे. त्यामुळे ते स्वतःला अतिरिक्त ताण देणार नाहीत. पॅट्रीक कमिन्सने सांगितले होते की, विश्रांती करण्यापेक्षा अधिकाधिक क्रिकेट खेळल्याने गोलंदाजीत सुधारणा होते. त्यामुळे आयपीएलचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होईल असे नाही वाटत.''  

टॅग्स :राहूल द्रविडआयपीएलआयपीएल 2019भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावर्ल्ड कप २०१९