Join us  

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

सुनील गावस्कर, विराट कोहली यांच्यावरही केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:06 AM

Open in App
ठळक मुद्देराहुल द्रविडच्या पारड्यात 52 टक्के, तर सचिन तेंडुलकरला 48 टक्के मतसुनील गावस्कर आणि विराट कोहली अऩुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी

सचिन तेंडुलकरच्या छायेखाली राहुल द्रविड झाकोळला गेला, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं दिली होती. भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये श्रेष्ठ कोण हा वाद नेहमी सुरूच राहिल. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली या पिढीपर्यंत भारताने जगाला अनेक दिग्गज खेळाडू दिले. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या मागील 50 वर्षांतील सर्वोत्तम कसोटी फलंदाज कोण, याची निवड करणे अवघडच आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक धावा, शतकं आहेत आणि त्यामुळे तोच सर्वोत्तम ठरेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण, यावेळी हा पुरस्कार दी वॉल राहुल द्रविडनं पटकावला आहे. 

विस्डन इंडियानं घेतलेल्या मतदानात द्रविडनं मास्टर ब्लास्टर तेंडुलकरला मागे टाकले असून भारताच्या 50 वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजाचा मान पटकावला. द्रविड आणि तेंडुलकर यांच्यात कडवी टक्कर झाली, परंतु यात थोड्याश्या फरकानं द्रविडनं बाजी मारली. यासाठी जवळपास 11400 चाहत्यांनी मतदान केलं. त्यात द्रविडच्या पारड्यात 52 टक्के, तर तेंडुलकरच्या पारड्यात 48 टक्के मतदान पडले.   सुनील गावस्कर आणि विराट कोहली यांच्यातही चुरस रंगली. गावस्कर यांनी तिसरे क्रमांक पटकावले,तर  चौथ्या स्थानावर कोहली राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत सचिन तेंडुलकर 15921 धावांसह आघाडीवर आहे. राहुल द्रविड 13288 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. द्रविडनं 164 सामन्यांत 52.31च्या सरासरीनं या धावा केल्या आहेत. तेंडुलकरनं 200 कसोटींमध्ये 53.78च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांत 51.12च्या सरासरीनं 10122 धावा, तर कोहलीनं 86 कसोटी सामन्यांत 53.62 च्या सरासरीनं 7240 धावा केल्या आहेत.

भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन  

टॅग्स :राहूल द्रविडसचिन तेंडुलकरविराट कोहलीसुनील गावसकर