R Ashwin Retirement, Farewell Match, IND vs AUS : भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गाब्बा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सामना संपल्यानंतर अश्विन पत्रकार परिषदेसाठी आला आणि त्याने सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विकेट्स घेणारा आणि टीमला अनेक प्रसंगी सामने जिंकून देणाऱ्या अश्विनने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. तो यापुढे IPL आणि इतर क्लब क्रिकेट खेळतच राहणार आहे, असे त्याने यावेळी स्पष्ट केले. पण साऱ्यांनाच पडलेला प्रश्न म्हणजे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन सामने शिल्लक असताना अश्विनने मध्येच निवृत्ती जाहीर का केली? यामागे एक खास कारण आहे. त्याच कारणामुळे महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांच्याप्रमाणेच तोदेखील निरोपाच्या सामन्याला मुकला.
अश्विनने मालिकेच्या मध्येच निवृत्ती का घेतली?
आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोन अनुभवी अष्टपैलू खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघात जागा मिळाली होती. दुसऱ्या कसोटी अश्विनला संधी मिळाली. पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने दोन डावांत अनुक्रमे २२ आणि ७ धावा केल्या. तर गोलंदाजीत केवळ १ बळी घेतला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला वगळून रवींद्र जाडेजाला संधी देण्यात आली. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. पण जाडेजाने झुंजार ७७ धावांची खेळी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर आणले. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात जाडेजाची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. हे सारे ओळखून अश्विनने मालिकेच्या मध्यातच निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
निरोपाच्या सामन्याला मुकला...
अश्विनने मालिकेच्या मध्यात निवृत्ती घेतल्याने अनेक महान भारतीय खेळाडूंप्रमाणे अश्विनलाही निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी अडलेडमध्ये खेळली गेली. अश्विन या सामन्याचा एक भाग होता. मात्र, गाबा कसोटीत त्याच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली. तिसऱ्या कसोटीत जाडेजाने धडाकेबाज खेळी केली. अशा स्थितीत अश्विन पुढच्या २ कसोटींमध्ये बाकावरच बसल्याचे दिसले असते. अशा परिस्थितीत त्यानी निवृत्तीचा निर्णय घेतल्याने त्याला निरोपाचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, शिखर धवन अशा बड्या खेळाडूंप्रमाणेच अश्विनलाही निरोपाचा सामना मिळाला नाही.