Join us

अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप

फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही लाभ झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2024 08:18 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीत अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन जसप्रीत बुमराहला मागे टाकून ‘नंबर वन’ गोलंदाज बनला. बुमराह तिसऱ्या स्थानावर घसरला. चायनामॅन कुलदीप यादवनेही मोठी झेप घेतली आहे. फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही लाभ झाला आहे.

३७ वर्षांच्या अश्विनने धर्मशाला येथे दोन्ही डावांत नऊ बळी घेतले होते. त्याचे ८७० रेटिंग गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ८४७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कागिसो रबाडा चौथ्या आणि पॅट कमिन्स पाचव्या स्थानावर आहे. अव्वल १० गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर कायम असून कुलदीप यादव हा १५ स्थानांची झेप घेत १६ व्या स्थानी पोहोचला. अव्वल २० गोलंदाजांमध्ये भारताचे चार गोलंदाज आहेत.

रोहित शर्मा सहाव्या स्थानी

धर्मशाला येथे शतके ठोकणारे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत प्रगती साधली. रोहित सहाव्या तर यशस्वी आठव्या स्थानावर पोहोचला. विराट कोहली नवव्या स्थानावर घसरला. ऋषभ पंत १५ व्या आणि शुभमन २१ व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल, इंग्लंडचा ज्यो रूट दुसऱ्या, पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पाचव्या स्थानावर आहे.

अष्टपैलूंमध्ये एक बदल

अव्वल पाच अष्टपैलू खेळाडूंमध्ये केवळ एक बदल झाला असून, वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरने पाचवे स्थान पटकावताना भारताच्या अक्षर पटेलला सहाव्या क्रमांकावर खेचले. रवींद्र जडेजाने अव्वल, तर अश्विनने दुसरे स्थान कायम राखले आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि इंग्लंडचा ज्यो रूट अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी कायम आहेत.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआर अश्विनरोहित शर्मायशस्वी जैस्वालजसप्रित बुमराह