आयपीएलमध्ये शुक्रवारी चेपॉक येथे चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याने चेन्नईवर आठ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यानंतर कोलकाताचा सलामीवीर क्विंटन डीकॉक हा चेन्नईच्या खेळाडूंशी बोलताना बाटलीतून पाणी पिताना दिसला. परंतु, त्याची पाणी पिण्याची विचित्र पद्धत अनेकांना हैराण करणारी ठरली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डिकॉकच्या हातात पाण्याची बाटली आहे आणि तो चेन्नईच्या खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर नंतर तो बाटलीची खालची बाजू दाताने चावून फोडतो. डी कॉकचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. बाटलीच्या झाकणाचा शोध लागण्यापूर्वी लोक कदाचित अशाच पद्धतीने पाणी पीत असतील, असे एका जणाने म्हटले आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने डी कॉक अजूनही जुन्या काळात जगत आहे, अशी कमेंट केली.
चेन्नईविरुद्ध सामन्यात क्विंटन डिकॉकने १६ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात तीन षटकारांचा समावेश आहे. कोलकात्याच्या संघाला विजयासाठी फक्त १०३ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. क्विंटन डीकॉक आणि सुनील नारायण यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागिदारी केली. या सामन्यात कोलकाताने चेन्नईचा आठ विकेट्स राखून पराभव केला.