दुबई : ‘आयपीएलमध्ये हातातोंडाशी आलेला विजय कसा मिळवायचा हे आमचा संघ विसरलेला दिसतो, उलट जिंकलेला सामना गमावणे ही सवयच जडलेली दिसते,’ अशी कबुली पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पराभवानंतर दिली आहे.
राजस्थान रॉयल्सकडून अखेरच्या षटकात दोन धावांनी झालेला पराभव पचविणे फारच कठीण असल्याची खंत व्यक्त करीत कुंबळे म्हणाले, ‘आम्ही दुबईत खेळत असतो तेव्हा वारंवार असे घडते. आमच्या संघाला सामना गमविण्याची सवयच झाली की काय, अशी शंका येते. सामना १९व्या षटकातच जिंकण्याच्या निर्धाराने खेळा, असा संदेश मी दिला होता. दुर्दैवाने सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. नवा फलंदाज खेळपट्टीवर असला की विजय हा लॉटरीसारखा ठरतो.’
दिग्गज लेगस्पिनर कुंबळे यांनी कार्तिक त्यागीची स्तुती केली. ‘त्यागीने ज्या पद्धतीने अखेरचे षटक टाकले ते पाहता विजयाचे श्रेय त्याला दिले पाहिजे. तो ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाकेल हे स्पष्ट होते मात्र आमच्या फलंदाजांनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले नाहीत,’ असे कुंबळे यांनी सांगितले.
‘अजून पाच सामने खेळायचे असून या पराभवामुळे विचलित होण्याची गरज नाही. हा पराभव मात्र विसरता येणार नाही, मात्र खेळाडूंनी विजयी निर्धारानेच खेळायला हवे,’ असेही कुंबळे म्हणाले.