Join us

आयपीएल फ्रँचायझीकडून शाहीन आफ्रिदीची टिंगल; अर्शदीप सिंगचा दाखला अन् भन्नाट ट्विट

भारतीय संघाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यांत १६० धावांचा यशस्वी बचाव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:07 IST

Open in App

भारतीय संघाने पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यांत १६० धावांचा यशस्वी बचाव केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १२ चेंडूंत १७ धावांची गरज असताना मुकेश कुमारने १९व्या षटकात ७ धावा दिल्या आणि ऑसींना ६ चेंडूंत १० धावाच करायच्या होत्या. पण, अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) अप्रतिम मारा केला.  बाऊन्सर आणि यॉर्कर मारा करून दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडूही त्याने यॉर्कर टाकला होता, परंतु मॅथ्यू वेडने डीपच्या दिशेने चेंडू टोलवला आणि श्रेयस अय्यरने सोपा झेल घेतला. अर्शदीपने २०व्या षटकात ३ धावा दिल्या आणि महत्त्वाची विकेट घेऊन भारताला ६ धावांनी विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला ८ बाद १५४ धावाच करता आल्या.

अर्शदीप सिंगच्या या अप्रतिम षटकानंतर आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सने पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी याला ट्रोल केले. भारताने पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी सहज खिशात घातली. त्यानंतर पंजाब किंग्सने मजेशीर ट्विट केले. त्यात त्याने अर्शदीपच्या शेवटच्या षटकाचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावर लिहिले की, या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर तुझं नाही चालणार, मॅथ्यू वेड...

शाहीन आफ्रिदीचा संबंध काय?ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. मॅथ्यू वेड त्या सामन्यात मॅच विनर खेळाडू ठरलेला. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  १८व्या षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १५५ झाली होती. त्यांना विजयासाठी १२ चेंडूंत २२ धावा हव्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याने चेंडू स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे सोपवला. १९व्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेत मॅथ्यू वेडला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर वेडचा झेल टाकला गेला अन् त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सलग ३ षटकार खेचून सामना संपवला. पंजाब किंग्सने याच सामन्यावरून शाहीनला काल ट्रोल केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअर्शदीप सिंगपंजाब किंग्स