सुनील गावसकर -
आयपीएल सामने पुढे सरकत असताना काही जुन्या गोष्टी पुन्हा अनुभवायला मिळाल्या. पंजाब संघ पुन्हा एकदा पाठलाग करताना अडचणीत आला. जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला. मागच्या चुकांवरुन बोध घेण्याच्या चर्चा सुरू असताना चुकांची मात्र पुनरावृत्ती झाली. अखेरच्या तीन षटकाआधीपर्यंत ज्यांना काही आशा नव्हती, अशा राजस्थानला विजय भेटवस्तूच्या स्वरुपात मिळाला.
लीगमध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. चांगली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर खेळपट्टीवर असलेल्या फलंदाजांना अधिक गडी न गमावता, जोखीम न घेता अखेरपर्यंत खेळायचे असते. पंजाबची मागच्या सत्रातही चांगली सुरुवात झाली होती. राजस्थानविरुद्ध लढतीप्रमाणे सलामीचा फलंदाज बाद होताच दुसरा फलंदाजही पाठोपाठ माघारी फिरतो. याचा अर्थ खेळपट्टीवर नवे चेहरे असल्याने सेट झालेल्या फलंदाजांप्रमाणे धावा काढणे त्यांच्यासाठी कठीण असते.
याशिवाय पंजाबने अनियमित गोलंदाजांकडून षटके टाकल्यामुळे १५-२० धावा अधिक गेल्या. यामुळे सामन्याचे चित्र पालटले. राजस्थान संघानेदेखील रेयान परागकडून गोलंदाजी केल्यामुळे त्याच्या षटकात पराभव झाल्यासारखाच होता. कार्तिक त्यागी आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी संयम राखला. त्यामुळे राजस्थानचा रोमहर्षक विजय साकार झाला.
राजस्थान संघ आता दिल्लीविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दिल्लीविरुद्ध लहानशी चूक त्यांना महागडी ठरू शकते. सॅमसनला कर्णधार या नात्याने आघाडीवर राहावे लागेल. पंजाबसाठी दिलासादायी बाब अशी की, हैदराबाद संघ तळाच्या स्थानावर आहे. अशावेळी पंजाबने योग्य खेळाडूंची निवड केल्यास चित्र बदलेल. हैदराबाद संघ आता अन्य संघांचे समीकरण बिघडवू शकतो.
त्यांना निकालाची पर्वा न करता आनंद घेता येईल. हैदराबादने संघात योग्य खेळाडू, त्यातही बिग हिटर्स घेण्यावर भर द्यावा. दिल्ली आणि सीएसके संघातील संतुलन बघा. त्यांच्या संघ संयोजनावरुन हैदराबादला चांगला बोध घेता येऊ शकेल.