Join us

पुजारा कौंटी क्रिकेट खेळणार

९५ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारा चेतेश्वर पुजारा गेल्या अनेक काळापासून धावांसाठी झगडतो आहे. याच कारणामुळे त्याला भारतीय संघाबाहेरही व्हावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 05:43 IST

Open in App

नवी दिल्ली : खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर गेलेल्या चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ससेक्स संघात तो ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडच्या जागी खेळेल. प्रथम श्रेणी आणि लिस्ट ‘ए’च्या सामन्यांसाठी पुजारा उपलब्ध राहणार असल्याचे ससेक्स क्लबकडून सांगण्यात आले.

९५ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारा चेतेश्वर पुजारा गेल्या अनेक काळापासून धावांसाठी झगडतो आहे. याच कारणामुळे त्याला भारतीय संघाबाहेरही व्हावे लागले. त्यामुळे पुजाराने आपला मोर्चा आता कौंटी क्रिकेटकडे वळवला आहे. याआधी त्याने यॉर्कशायर आणि नॉटिंघमशायर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यासंदर्भात बोलताना ससेक्स क्लबकडून सांगण्यात आले की, ‘आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि पहिल्या बाळाचा जन्म होणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने कौंटी क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता त्याच्या जागी आम्ही चेतेश्वर पुजाराला संघात समाविष्ट केले आहे.’

इंग्लिश कौंटी सामन्यांना ७ एप्रिलापासून सुरुवात होणार आहे, तर चेतेश्वर पुजारा खेळत असलेल्या ससेक्स संघाचा सामना १४ एप्रिलला डर्बिशायर संघाविरुद्ध असेल. श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळले होते.

टॅग्स :चेतेश्वर पुजारा
Open in App