ठळक मुद्देपृथ्वीने या सामन्यात १७९ चेंडूंत १९ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर २०२ धावांची खेळी साकारली.
मुंबई : पृथ्वी शॉ याने आज डबल धमाका केला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत पृथ्वीने झंझावाती द्विशतक झळकावले. पृथ्वीच्या या द्विशतकी खेळीमुळे त्याने भारताच्या संघासाठी आपली दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये पृथ्वी हा काही महिन्यांपूर्वी दोषी आढळला होता. त्यावेळी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घातली होती. पण या बंदीनंतर मैदानात उतरत पृथ्वीने आतापर्यंत सातत्याने दमदार फलंदाजी केली आहे. यापूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेतही पृथ्वीने तीन अर्धशतके झळकावली होती. आता तर त्याने द्विशतकी खेळी साकारत भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. पृथ्वीने या सामन्यात १७९ चेंडूंत १९ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर २०२ धावांची खेळी साकारली.
