Prithvi Shaw vs Mumbai Cricket Association : मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हा सध्या वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेसाठी मुंबईच्या संघातून त्याला वगळण्यात आले. त्यावर त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीवरही अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून उत्तर देण्यात आले आहे. MCA च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पृथ्वी शॉ बद्दल अनेक आरोप केले असून तो स्वत:च स्वत:चा शत्रू असल्याचे विधान केले आहे.
MCA चे म्हणणे काय? काय-काय केले आरोप?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले, "आम्हाला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत १० खेळाडूंसोबत खेळावे लागले. पृथ्वी शॉ च्या फिटनेसमुळे त्याला फिल्डिंगमध्ये लपवावे लागत होते. चेंडू बाजूने निघून जात होता, पण त्याला अडवता येत नव्हता. फलंदाजी करतानाही चेंडूपर्यंत पोहोचणे त्याला अवघड जायचे. फिटनेस, शिस्त आणि अँटिट्यूड या तीनही गोष्टीत तो खूपच वाईट होता आणि नियम सगळ्यांसाठी सारखे असतात. जर तुम्ही नियमांचे पालन करत नसाल तर तुम्हाला संधी मिळणार नाही. संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनीही त्याच्या तक्रारी करायला सुरुवात केली होती."
सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या कालावधीत पृथ्वी शॉ बहुतांश वेळा सराव सत्रांना गैरहजर असायचा. कारण तो रात्रभर कुठेतरी गायब असायचा आणि सकाळी सहा वाजता हॉटेलमध्ये तोंड दाखवायचा, असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
पृथ्वी शॉ ने केली होती इन्स्टाग्राम स्टोरी
पृथ्वी शॉ ने सोशल मीडियावर लिस्ट-ए मधील आकडेवारी शेअर करून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. "देवा, मला आणखी काय-काय बघावं लागणार आहे ... ६५ सामने, ३३९९ धावा, ५५.७०ची सरासरी, १२६ चा स्ट्राइक रेट ... माझे हे आकडे खेळासाठी पुरेसे नाहीत. पण मी खचणार नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि कदाचित चाहते माझ्यावर विश्वास ठेवतील. कारण मी नक्कीच पुनरागमन करेन.. ओम साई राम.." असे त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते.
![]()
सोशल मीडियावर पोस्टवरही MCA ने दिलं उत्तर
"सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचा MCAच्या निवड समितीवर काही परिणाम होईल असं कुणाला वाटत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. त्याला स्वत:वर मेहनत घ्यायला हवी. त्याला स्वत:ला शिस्त लावण्याची खूप गरज आहे. आम्ही त्याला लहान मुलासारखं समजवत बसवणार नाही. तो बराच काळ क्रिकेट खेळलाय. सगळ्यांनी त्याला पुरेसं सहकार्य केलंय. शेवटी कसं वागायचं हे त्याने ठरवलं पाहिजे. असे बेशिस्त वर्तन त्याने याआधीही केलं आहे. त्यामुळे त्याचं कुणीही शत्रू नाही. तो स्वत:च स्वत:चा शत्रू आहे. त्याने वेळेवर सुधारणा करणे गरजेचे आहे," असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
Web Title: Prithvi Shaw Was Out All Night Entered Hotel At 6 AM MCA Report Makes Big Revelation On His Exculsion from Mumbai Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.