Join us

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर कारवाई; ८ महिन्यांसाठी निलंबन

शरीरात प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य आढळल्यानं कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 20:07 IST

Open in App

मुंबई: उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर बीसीसीआयनं कारवाई केली आहे. पृथ्वी शॉ याला ८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. कफ सिरप घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेल्याचं बीसीसीआयनं म्हटलं. या प्रकरणी वाडा संघटनेच्या नियमानुसार पृथ्वी दोषी आढळला. त्यामुळे ८ महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आलं.  पृथ्वी शॉनं डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं त्याच्यावर कारवाई केली. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. यानंतर बीसीसीआयनं उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली.  या प्रकरणी पृथ्वीनं बीसीसीआयला स्पष्टीकरण दिलं. माझ्या हातून जाणूनबुजून हे कृत्य घडलेलं नाही. तर कफ सिरप घेताना उत्तेजकद्रव्य माझ्या शरीरात गेलं, अशा शब्दांमध्ये पृथ्वीनं त्याची बाजू मांडली. बीसीसीआयनं पृथ्वीचा हा बचाव मान्य केला. पृथ्वीनं कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकद्रव्य घेतलेलं नाही, हे बीसीसीआयला पटलं. मात्र तरीही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं पृथ्वीला ८ महिने निलंबन केलं. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी या निलंबनाची मुदत संपेल. 

टॅग्स :पृथ्वी शॉ