मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सराव सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर मैदानावर परतलेल्या मुंबईकरपृथ्वी शॉला सलग तीन सामन्यांत अपयशाचा पाढा गिरवावा लागला. ऑसी दौऱ्यात पर्यायी सलामीवीर म्हणून भारतीय संघात पृथ्वीचा समावेश करण्यात आला होता, परंतु सराव सामन्यात त्याला दुखापत झाली आणि ऑस्ट्रेलियात कसोटी खेळण्याचे त्याचे स्वप्न लांबणीवर पडले. त्यानंतर वैद्यकीय उपचार आणि व्यायामानंतर मैदानावर परतलेल्या पृथ्वीचे कमबॅक काही चांगले झाले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील तीन सामन्यांत त्याला अपयश आले. पण, सोमवारी त्यानं आपल्या तडाखेबाज फलंदाजीची झलक दाखवली.
पृथ्वीला सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत सिक्कीम, पंजाब व मध्य प्रदेश या संघांविरुद्ध अनुक्रमे 10, 8 व 0 धावा करता आल्या होत्या. पण, या निराशाजनक कामगिरीने तो खचला नाही. त्याने सोमवारी गोव्याविरुद्ध झोकात फटकेबाजी केली. त्याने गोव्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि 47 चेंडूंत 71 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत 5 चौकार व 7 षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 141 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत सहज पार केले. मुंबईने हा सामना 6 विकेट राखून सहज जिंकला.
गोवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शगुन कामत ( 27) आणि कर्णधार अमोघ देसाई ( 38) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 120च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. पण, ही दोघं माघारी परतली आणि गोव्याच्या धावांचा वेग मंदावला. अमित वर्मा ( 27) आणि किनान वाझ ( 26) यांनी गोव्याला 4 बाद 140 धावांपर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात मुंबईकडून पृथ्वी व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी 11.1 षटकांत 95 धावांची भागीदारी करून दिली. रहाणेने 25 चेंडूंत 31 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने नाबाद 24 धावा करत मुंबईचा विजय पक्का केला. श्रेयस अय्यर ( 2) आणि सिद्धेश लाड ( 2 ) यांना अपयश आले.