मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) विजय हजारे ट्रॉफी संघातून वगळल्याबद्दल पृथ्वी शॉ याच्या रागाला महत्त्व न देता म्हटले की, तो सतत शिस्त मोडत आहे. तो स्वतःचा शत्रू आहे. 'एमसीए'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही वेळा खराब तंदुरुस्ती, वृत्ती आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे संघाला त्याला मैदानावर लपवून ठेवणे भाग पडले.
शॉने १६ सदस्यीय विजय हजारे चषकासाठी संघात स्थान न मिळाल्याने समाजमाध्यमावर पोस्ट करत राग व्यक्त केला होता. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता. 'एमसीए'च्या अधिकाऱ्याने सांगितले की, सय्यद मुश्ताक अली चषकात आम्ही दहा क्षेत्ररक्षकांसोबत खेळत होतो. कारण, शॉ याला लपवावे लागत होते. चेंडू त्याच्यापासून निघून जात होता; पण त्याला तो पकडता येत नव्हता.
फलंदाजी करतानाही त्याला चेंडूपर्यंत पोहोचण्यात अडचण येत होती. त्याची तंदुरुस्ती, शिस्त आणि वृत्ती वाईट आहे आणि वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम होऊ शकत नाहीत. संघातील वरिष्ठ खेळाडूही त्याच्या या वृत्तीबद्दल तक्रारी करू लागले होते.
सराव सत्राला दांडी अन् रात्रही बाहेर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान शॉ नियमितपणे सराव सत्र चुकवत असे. रात्रभर बाहेर राहिल्यानंतर सकाळी सहा वाजता संघ असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचायचा.
अधिकाऱ्याने सांगितले की, मैदानाबाहेरील कृत्यांमुळे चर्चेत असलेला शॉ आपल्या प्रतिभेला न्याय देत नाही आणि अशा सोशल मीडिया पोस्टमुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही. याआधी ऑक्टोबरमध्येही याच कारणांमुळे शॉला मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले होते.