Join us

पृथ्वी शॉच्या 'Dope Test' प्रकरणावर संशयाची सुई; माजी प्रशिक्षकांचा धक्कादायक दावा

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यानं उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला 8 महिन्यांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:11 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यानं उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला 8 महिन्यांच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार पृथ्वीला खोकला आणि ताप झाला होता आणि त्यासाठी त्यानं घेतलेल्या औषधातून उत्तेजक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. कफ सिरप घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेल्याचं बीसीसीआयनं म्हटलं. मात्र, या प्रकरणात आता नवं वळण मिळालं आहे. 

22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. यानंतर बीसीसीआयनं उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली. पण, मुंबई संघाचे माजी प्रशिक्षक विनायक सामंत आणि फिजीओ दीप तोमर यांनी पृथ्वी शॉ याने त्याला खोकला व सर्दी झाल्याचे कळवले नव्हते, असा गौप्यस्फोट केला आहे.

सामंत व तोमर म्हणाले की,'' त्याला किंचितसा ताप होता, परंतु खोकला किंवा सर्दीची लक्षण नव्हती. त्यानं आमच्याकडे यासंदर्भात काही तक्रारही केली नाही किंवा औषध हवं असंही सांगितलं नाही. आम्ही खेळाडूंसोबतच होतो.'' संघ व्यवस्थापक गणेश अय्यर यांनीही सांगितले की,''मी संघासोबतच प्रवास करत होतो. पृथ्वीनं मलाही याबाबत काही सांगितले नाही. त्याला किंचितशी सर्दी झाल्याचे मला जाणवले, परंतु त्याबद्दलही त्यानं मला सांगितले नाही.''

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रुमख तुफान घोष आणि फिजीओ आशिष कौशिक यांनी सांगितले की,''पृथ्वीनं त्याच्या वडिलांशी संपर्क केला आणि त्यांनी त्याला औषध सुचवले. पृथ्वीनं इंदौर येथील औषधांच्या दुकानात जाऊन औषध घेतले.'' पण, या विधानानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे एखादा खेळाडू हॉटेलमधून एकटा कसा बाहेर जाऊ शकतो. 

पृथ्वीनं कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकद्रव्य घेतलेलं नाही, हे बीसीसीआयला पटलं. मात्र तरीही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं पृथ्वीला ८ महिने निलंबन केलं. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी या निलंबनाची मुदत संपेल. 

टॅग्स :पृथ्वी शॉबीसीसीआय