लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई संघ सोडून महाराष्ट्र संघात दाखल झालेला स्टार फलंदाज पृथ्वी शाॅ व अर्शिन कुलकर्णी यांच्या दमदार दीडशतकांच्या जोरावर महाराष्ट्राने तीनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईविरुद्ध पहिला ३ बाद ४६५ धावांवर घोषित केला. यानंतर मुंबईने १ बाद २३ धावा अशी सुरुवात केली.
खेळ थांबला तेव्हा अंगक्रीश रघुवंशी (नाबाद ३) व अखिल हेरवाडकर (नाबाद १२) मैदानावर होते. मुकेश चौधरीने मुशीर खानला (४) बाद करून मुंबईला सुरुवातीलाच धक्का दिला. त्याआधी, गहुंजे येथे एमसीए स्टेडियमवर मंगळवारी सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी-अर्शिन यांनी ४९.४ षटकांत ३०५ धावांची सलामी दिली. अर्शिनने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले तर, ९५ चेंडूंत १९ चौकार आणि एका षटकारासह शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या १२२ चेंडूंत दीशतक पूर्ण केले. द्विशतकाच्या जवळ असताना शम्स मुलानीने त्याला झेलबाद केले. त्याने १४० चेंडूंत ३३ चौकार आणि ४ षटकारांसह एकूण १८६ धावा केल्या.
दुसरीकडे, पृथ्वीने संयमी खेळी केली. त्याने ८४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर १४० चेंडूंत शतक पूर्ण केले. पृथ्वीने २२० चेंडूंत २१ चौकार आणि ३ षटकारांसह १८१ धावा केल्या. पृथ्वीने सिद्धेश वीरसोबत (६०) ११८ धावांची भागीदारी केली. मुशीर खानने वीरला बाद केल्यानंतर पृथ्वीलाही बाद केले. त्यानंतर सौरभ नवले (नाबाद २५) आणि हर्षल काटे (नाबाद १०) यांनी संघाला ४६५ पर्यंत नेले. मुंबईकडून मुशीर खानने दोन गडी बाद केले.
पृथ्वी शाॅ भडकला
बाद झाल्यानंतर पृथ्वी तंबूत जात असताना मुशीरने काहीतरी टिप्पणी केली. दोघांमध्ये बाचाबाची झाली. पृथ्वीने मुशीरवर बॅट उगारली. त्यानंतर पंचांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केले.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र (पहिला डाव) : ८१ षटकांत ३ बाद ४६५ धावा घोषित (अर्शिन कुलकर्णी १८६, पृथ्वी शाॅ १८१; मुशीर खान २/५३.) मुंबई (पहिला डाव) : ७ षटकांत १ बाद २३ धावा (अखिल हेरवाडकर खेळत आहे १२, अंगक्रीश रघुवंशी खेळत आहे ३; मुकेश चौधरी १/४.)