Join us  

प्रवीण कुमारचं 'ते' गुपित केवळ रोहित शर्मालाच माहीत होतं...

भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमारनं नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:07 AM

Open in App

भारतीय संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमारनं नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. प्रवीण कुमार हा आपल्या कामगिरीसह विचित्र वागणुकीमुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्यामुळे त्याला अनेकदा दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. ''भारतीय संघासाठी खेळनं ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असे एका मुलाखतीत बोलताना प्रवीणने सांगितले. या मुलाखतीतच त्यानं असं एक गुपित जे केवळ रोहित शर्माला माहीत असल्याचा धक्कादायक खुलासाही केला. 

2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या मालिकेत प्रवीणने लक्षणीय कामगिरी केली होती. मात्र, संघातून बाहेर करण्यात आल्यानंतर तो अतिशय तणावात होता. त्यावेळी, स्वत:ला  गोळी घालून संपवून टाकावे, असा विचार मनात आला होता, असेही प्रवीणने सांगितले. ''जेव्हा स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा विचार करत होतो. त्याचवेळेस, गाडीत असलेल्या मुलांच्या फोटोवर माझी नजर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य होते. त्यांचा फोटो पाहून मी मुलांसाठी तरी हे धाडस करू शकत नाही. त्यानंतर, तो विचार मी डोक्यातून कायमचा काढून टाकला, असे प्रवीणने सांगितले.

प्रवीणने असाही खुलासा केला की,''मला एका डोळ्यानं नीट दिसत नाही. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करतानाही ही अडचण होतीच. कनिष्ठ पातळीवर खेळताना माझ्या डोळ्यावर चेंडू आदळला होता. त्यानंतर दिल्लीत उपचार घेत असताना डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. पण, त्यानंतरही मला दिसेल, याची हमी त्यांनी दिली नाही. त्यामुळे वडिलांनी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट कुटुंबीयांसह रोहित शर्मालाच माहित होती.''

प्रवीणनं 6 कसोटी सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या. 68 वन डे आणि 10 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे 77 व 8 विकेट्स आहेत.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ