नवी दिल्ली - बीसीसीआयने घातलेल्या बंदीमुळे भारतीय संघाकडून खेळता येणार नसेल, तर दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एस.श्रीसंतच्या प्रयत्नांना बीसीसीआयने सुरूंग लावले आहेत. श्रीसंतला भारतीय संघाबरोबरच अन्य कुठल्याही देशाकडून खेळता येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
श्रीसंतने दुसऱ्या देशाकडून खेळण्याबाबत दिलेल्या संकेतांबाबत बोलताना बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना म्हणाले, "एखाद्या खेळाडूला दुसऱ्या देशाकडून खेळण्याची परवानगी देण्याबाबत आयसीसीचे नियम स्पष्ट आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूच्या पालक संघटनेने त्याच्यावर बंदी घातली असेल तर असा खेळाडू अन्य कुठल्याही देशाकडून खेळू शकत नाही."
बीसीसीआयने आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या एस.श्रीसंतने भविष्यात दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले होते. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतच्या क्रिकेट खेळण्यावरील आजीवन बंदीचा निर्णय कायम ठेवला होते. 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचे नाव आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली.
कोर्टाच्या एक सदस्यीय न्यायाधीशाने 18 सप्टेंबरला बीसीसीआयला श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने एक सदस्यीय खंडपीठाचा निर्णय रद्द करत आजीवन बंदी कायम ठेवली. श्रीसंतने एशियानेट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
"माझ्यावर आयसीसीने नाही, तर बीसीसीआयने बंदी घातली आहे. भारतासाठी नसेल पण मी दुस-या देशासाठी खेळू शकतो. मी आता 34 वर्षांचा असून मी आणखी जास्तीत जास्त सहावर्ष क्रिकेट खेळू शकतो. आपण भारतीय संघ म्हणतो असलो तरी, बीसीसीआय खासगी संस्था आहे. त्यामुळे मी दुस-या देशाकडून खेळू शकतो. मला केरळसाठी रणजी, इराणी ट्रॉफी जिंकायची इच्छा होती पण तो निर्णय सर्वस्वी बीसीसीआयच्या हातात होता," असे श्रीसंत मुलाखतीत म्हणाला होता.