- सुनील गावस्कर
क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम लीगला पुन्हा एकदा सुरुवात होत असून ही स्पर्धा पूर्वीच्या तुलनेत अधिक भव्यदिव्य होईल, असा विश्वास आहे. आयपीएलनंतर लगेच विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. विश्वकप स्पर्धेचा फॉर्मेट वेगळा असला तरी प्रचंड फॉर्मात असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची संधी आहे. काही फे्रचायजींना अखेरच्या काही लढतींमध्ये विदेशी खेळाडूंची सेवा मिळणार नाही. कारण हे खेळाडू राष्ट्रीय संघाच्या सराव शिबिरात सहभागी होण्यासाठी मायदेशी परततील. ही एक स्पर्धेतील उणीव राहणार आहे. याचा विचार करीत अनेक फे्रचायजीनी बदली खेळाडू म्हणून लिलावामध्ये भारतीय खेळाडूंना पसंती दर्शविली आहे.
सीमेवर घडलेल्या दु:खदायक प्रसंगामुळे उद््घाटन समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि हा निधी राष्ट्रीय मदत कोषामध्ये जमा करण्यात येणार आहे. पण, उद््घाटन समारंभ म्हणजे पैशाचा अपव्यय असल्याचे मला वाटते.
गतविजेता चेन्नई संघ जेतेपद राखण्याच्या निर्धाराने या स्पर्धेत सहभागी होत असून सलामी लढतीत त्यांना बंगळुरु संघासोबत खेळायचे आहे. बंगळुरू संघ तुल्यबळ आहे, पण क्रिकेट जगतातील दोन आक्रमक फलंदाज संघात असतानाही त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या गोलंदाजांना मात्र कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. यावेळी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा गॅरी कर्स्टन सांभाळत असून मोक्याच्या क्षणी काय करायचे, याचे ते योग्य मार्गदर्शन करतील, अशी आशा आहे.
कर्स्टन भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना टीम इंडियाने विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता.
कॅप्टन कुल व कर्स्टन या जोडीच्या मॅजिकने संघाला जेतेपद पटकावून दिले होते.
आता बंगळुरूचा कर्णधार आक्रमक विराट कोहली आणि
कुल प्रशिक्षक कर्स्टन संघाला आवश्यक असलेला ताळमेळ साधण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. (पीएमजी)