Join us  

RCBच्या जखमेवर 'सॉल्ट'! शेवटच्या चेंडूवर उडी घेत केला रन-आऊट, १ धावेने KKRने मारली बाजी

Andre Russell Virat Kohli Karn Sharma Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना, फलंदाज धावले. पण मोक्याच्या वेळी किपर फिल सॉल्टने झेप घेत फलंदाजाला धावबाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 7:32 PM

Open in App

Andre Russell Virat Kohli Karn Sharma Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: कर्णधार श्रेयस अय्यरने केलेले अर्धशतक आणि फिल सॉल्टची ४८ धावांची भागीदारी यांच्या जोरावर  कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्स आणि रजत पाटीदार या दोघांनी वेगवान खेळी करत अर्धशतके ठोकली. हे दोघे बाद झाल्यावर दिनेश कार्तिक आणि कर्ण शर्मानेही झुंज दिली. पण अखेर फिल सॉल्टच्या हवेत उडी घेत शेवटच्या चेंडूवर रन आऊट केले आणि कोलकाताने १ धावेने सामना जिंकला.

२२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली १८ धावांवर बाद झाला. त्याच्या विकेटवरून वाद शमलाही नव्हता, तोच फाफ डु प्लेसिस ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार या जोडीने ४८ चेंडूत १०२ धावांची भागीदारी केली. या दोघांनी सामना RCBकडे पूर्णपणे झुकवला होता. पण आंद्रे रसेलने एका षटकात आधी विल जॅक्स (३२ चेंडूत ५५) आणि मग रजत पाटीदार (२३ चेंडूत ५२) दोघांना बाद केले. त्यामुळे सामना फिरला. त्यानंतर सुनील नारायणने देखील एकाच षटकात कॅमरोन ग्रीन आणि महिपाल लोमरॉर दोघांना माघारी पाठवले. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिनेश कार्तिक आणि सुयश प्रभुदेसाई यांनी झुंज दिली. दिनेश कार्तिक १९व्या षटकात २५ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना कर्ण शर्माने तीन षटकार लगावले. शेवटच्या २ चेंडूत ३ धावा हव्या असतानाच कर्ण शर्मा बाद झाला. १ चेंडूत ३ धावांची आवश्यकता असताना, चेंडू टोलवून दोन धावा काढण्याचा प्रयत्न सुरु होता, पण विकेटकिपर फिल सॉल्टने हवेत झेप घेत चेंडू स्टंपला लावला आणि सामना जिंकून दिला.

प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीच्या तीन षटकात बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पण चौथ्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात झाली. सलामीवीर फिल सॉल्ट १४ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. सुनील नारायण १०, अंगक्रिश रघुवंशी ३, वेंकटेश अय्यर १६ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि आंद्र रसेल यांच्या चांगली भागीदारी झाली. श्रेयसने ३६ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार खेचत ५० धावा केल्या. रिंकू सिंगने १६ चेंडूत २४, आंद्रे रसेलने २० चेंडूत नाबाद २७, रमणदीप सिंगने ९ चेंडूत नाबाद २४ धावा करून छोट्या पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळेच कोलकाताला २० षटकांत ६ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून कॅमेरॉन ग्रीन, यश दयालने २-२, तर मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसनने १-१ बळी टिपला.

टॅग्स :आयपीएल २०२४श्रेयस अय्यरविराट कोहलीकोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर