नवी दिल्ली : ‘डोपिंगमुळे क्रिकेटपासून मला दूर राहावे लागले आणि हा काळ माझ्यासाठी एका मानसिक छळवादाप्रमाणे होता; मात्र यामुळे माझी धावांची भूक आणखी वाढली आहे,’ असे मत भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने व्यक्त केले. गेल्या वर्षी नकळतपणे प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्यानंतर पृथ्वी डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. यानंतर बीसीसीआयने २० वर्षीय पृथ्वीवर १५ नोव्हेंबरपर्यंत बंदीची कारवाई केली होती.
आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सच्या इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रामध्ये संवाद साधताना पृथ्वी म्हणाला की, ‘ती एक चूक होती. क्रिकेटपासून दूर राहण्याचा काळ एक मानसिक छळ होता. शंका आणि प्रश्न निर्माण होतात; मात्र मी माझ्यावरील विश्वास कायम राखला. काही काळ मी लंडनमध्ये घालवला आणि माझ्या तंदुरुस्तीवर भर दिला. बंदीचा काळ पूर्ण झाल्यानंतर मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि माझी धावांची भूक वाढवली होती. जेव्हा मी स्पर्धात्मक क्रिकेटसाठी बॅट हातात घेतली, तेव्हा जाणवले की मी लय गमावलेली नाही. यामुळे माझा निर्धार आणखी उंचावला.’
सध्या कोरोना विषाणूमुळे घरी बसावे लागत असल्याने मानसिक आरोग्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पृथ्वीने संयम राखणे जरुरी असल्याचेही म्हटले. (वृत्तसंस्था)
‘आपल्यापैकी अधिक लोकांकडे संयम नाही. त्यासाठी संयम राखण्यावर आपल्याला काम करावे लागेल. प्रत्येकाला आपली आवड जोपासावी लागेल आणि त्यामध्ये परिपक्वता आणावी लागेल. यामुळे आपला संयम वाढवण्यास अधिक मदत होईल.’
-पृथ्वी शॉ