Cheteshwar Pujara Century County Championship : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा इंग्लंडमधील फॉर्म हा भन्नाट सुरूच आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर कौंटी चॅम्पियनशीप खेळण्यासाठी पुजारा इंग्लंडमध्ये दाखल झाला. त्याने ससेक्स ( Sussex) क्लबकडून यंदा ४ सामन्यांत दोन द्विशतकं व दोन शतकांसह १४३.४०च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या होत्या आणि त्यात मंगळवारी आणखी एका शतकाची भर पडली. नेतृत्वाची धुरा खांद्यावर सोपवल्यानंतर पुजाराने कर्णधार म्हणून ससेक्सकडून पहिले शतक झळकावले. केवळ पुजाराच नव्हे, कौंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर ( पदार्पण), नवदीप सैनी व उमेश  यादव या भारतीयांनीही काल वर्चस्व गाजवले.
ससेक्स विरुद्ध मिडलेसेक्स या सामन्यात पुजाराने शतकी खेळी केली. अली ओर ( 7) व टॉम क्लार्क ( 33) माघारी परतल्यानंतर पुजाराने टॉम अल्सोपसह ससेक्सचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी केली. टॉम 277 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने 135 धावा करून माघारी परतला. पण, पुजारा दिवसभर खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने 182 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारांसह नाबाद 115 धावा केल्या आणि संघाला पहिल्या दिवशी 4 बाद 328 धावांचा पल्ला गाठून दिला.
लिसेस्टरशायर क्लबकडून कौंटी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या 
वॉशिंग्टन सुंदरने नॉर्थहॅम्टनशायरविरुद्ध पहिल्या दिवशी 20-1-69-4 अशी कामगिरी केली. त्यामुळे नॉर्थहॅम्टनशायरची अवस्था 7 बाद 218 धावा अशी झाली.   
वॉर्विकशायर क्लबकडून खेळणाऱ्या नवदीप सैनीने केंट क्लबविरुद्ध 10-2-59-3 अशी कामगिरी केली. उमेश यादवने 18-4-42-0 अशी कामगिरी केली. 
 
चेतेश्वर पुजाराची कामगिरी
6(15)
201*(387)
109(206)
12(22)
203(334)
16(10)
170*(197)