ठळक मुद्देश्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने सतरावं शतक ठोकलंफलंदाज किंवा संघातील अकरा खेळाडूंपैकी कोणालाही संघाला नेमकं कशाची गरज आहे याचा विचार करायचा असतो'जेव्हा तुम्ही धावा केल्यानंतर संघाला विजय मिळतो तेव्हा तो विजय खास असतो'
गॉल, दि. 29 - क्रिकेट खेळताना तुम्ही कितीही चांगल्या फॉर्ममध्ये असलात तरी नेहमीच धावांचा डोंगर उभा करायला जमत नाही. फॉर्ममध्ये असताना तुमचा परफॉर्मन्स ढासळला तर लगेच टीका व्हायला सुरुवात होते. मात्र या सर्वांचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर काहीच परिणाम होताना दिसत नाही. ज्या सामन्यांमध्ये मी धावा केल्या नाहीत त्यांची नोंद ठेवण्यावर माझा विश्वास नाही असं विराट कोहलीने सांगितलं आहे.
श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहली आतापर्यंत 58 कसोटी सामने खेळला असून हे त्याचं सतरावं शतक होतं.
'मी लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करत नाही. जेव्हा एखादा फलंदाज धावा करत नाही तेव्हा लोक लगेच त्याचे सामने मोजण्यास सुरुवात करतात. मात्र आम्ही फलंदाज किंवा संघातील अकरा खेळाडूंपैकी कोणालाही त्यावेळी संघाला नेमकं कशाची गरज आहे याचा विचार करायचा असतो', असं विराट कोहलीने सांगितलं आहे. श्रीलंकेचा पहिल्याच कसोटी सामन्यात 304 धावांना दारुण पराभव केल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने हे वक्तव्य केलं.
'दुस-या इनिंगमध्ये आम्हाला सकारात्मक खेळी करणं गरजेचं होतं. आणि अभिनव मुकुंदच्या साथीने मी ती खेळू शकलो याचा आनंद आहे. यामुळे विरोधी संघाला जास्तीत जास्त धावांचं आव्हान देण्यात आम्हाला यश मिळालं, सोबतच त्यांना ऑल आऊट करण्यासाठी तितका वेळही हाती आला', असं विराट बोलला आहे.
'किती सामन्यांमध्ये मी धावा करु शकलो नाही याचा खरंच मी विचार करत नव्हतो. कारण जेव्हा तुम्ही सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळत असता तेव्हा कोणत्या फॉरमॅटमधील किती इनिंगमध्ये धावा केल्या नाहीत याचा विचार करत नसतो. यावर विचार करण्यात जास्त वेळ खर्च करण्यात काही अर्थ नाही. पण जेव्हा तुम्ही धावा केल्यानंतर संघाला विजय मिळतो तेव्हा तो विजय खास असतो', असंही विराटने सांगितलं आहे.
भारताने दिलेल्या 550 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 245 धावात संपुष्टात आला. भारताने 304 धावांसह पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली. दुस-या डावात श्रीलंकेकडून सलामीवीर करुणारत्ने (97), डिकवेला (67) आणि मेंडीस(36) या तिघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.