Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपली अन् नव्या वादाची ठिणगी पडली! PCB नं सुरु केला 'ब्लेम गेम'

यजमान पाकला डावलण्यात आल्याचा आरोप; पाक क्रिकेट बोर्डानं सुरु केलीये ही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 20:08 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या नववा हंगाम भारतीय संघानं गाजवला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकत  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास रचला. एका बाजूला भारतीय संघाच्या विक्रमी विजयाचा आनंदोत्सव सुरु आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या विरोधात आवाज उठवण्याच्या तयारीत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल प्रेझेन्टेशन वेळीची मान सन्मानाची गोष्टीसह अन्य काही मुद्दे काढून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ब्लेम गेम सुरु केलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यावर आता नवा वाद गाजताना दिसतोय.  यजमान पाकला डावलण्यात आल्याचा आरोप पाक क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यजमानांना डावलले, मान न मिळाल्यानं पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाराजी

रविवारी, ९ मार्चला दुबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची फायनल खेळवण्यात आली. फायनल प्रेझेन्टेशन  दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ आणि स्पर्धेच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी पार पाडणारे सुमैर अहमद सय्यद दुबईच्या स्टेडियमवर उपस्थितीत होते. पण त्यांना स्टेजवर बोलण्यात आले नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हटलंय. या प्रकरणात आयसीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पण त्यावरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड समाधानी नाही. 

आयसीसीनं स्पष्टीकारण दिले, पण...

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल प्रेझेन्टेशन वेळी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी स्टेजवर दिसले. यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एकही सदस्य स्टेजवर नव्हता. त्यामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडली. यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना स्टेजवर आमंत्रित करण्याची तयारी केली होती. पण ते आले नाहीत. त्यामुळेच आयत्या वेळी नियोजनात बदल करावा लागला, असे आयसीसीने म्हटले आहे.  प्रेझेन्टेशन सेरेमनी वेळीच नाही तर या संपूर्ण स्पर्धेत आयसीसीकडून मोठ्या चुका झाल्याचेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.   

पाकिस्तान बोर्डाने वाचला आयसीसीच्या चुकांचा पाढा

पीटीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान आयसीसीने पाकिस्तान संदर्भात अनेक चुका केल्यात. भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्यावेळी लाइव्ह प्रसारण फिड लोगोमध्ये बदल करणे, लाहोरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्या आधी भारताचे राष्ट्रगीत वाजणं यासारख्या मोठ्या चुकांचा पाढा वाचत त्यांनी आयसीसी विरोधात आवाज उठवण्याची तयारी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्याआधीही अनेक मुद्दे चर्चेचा विषय ठरले. शेवटी स्पर्धा पार पडली. स्पर्धा संपली तरी वादग्रस्त गोष्टींची मालिका काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडपाकिस्तान