मिनी वर्ल्डकप म्हणून ख्याती असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले होते. यजमान म्हणून त्यांना खूप मान हवा होता, भारतीय संघ पाकिस्तानात हवा होता. पण तसे काहीच घडले नाही. प्रचंड पैसा कमविण्याच्या उद्देशाने २९ वर्षांनी पाकिस्तानने यजमानपद स्वीकारले खरे परंतू पीसीबीच्या हाती भलामोठा भोपळा लागला आहे.
पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ आपल्या संघाच्या सामन्यांना प्रेक्षक आणू शकले नाही. इतर देशांच्या सामन्यांना तर स्टेडिअममध्ये कोणी फिरकले देखील नाही. अशी अवस्था महागाईने पिचलेल्या पाकिस्तानात झालेली होती. लोक अन्न-पाण्यासाठी तरसलेले असताना पीसीबीने भारताच्या जिवावार पैसा कमवू या आशेने चॅम्पिअन्स ट्रॉफी भरविली होती. परंतू, आधीच कंगाल असलेल्या पीसीबीला ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.
पाकिस्तानसाठी महत्वाचा सोर्स हा भारतीय संघ होता. भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास गेला नाही. यामुळे पाकिस्तानात वातावरणच तयार झाले नाही. याचा परिणाम तिकीट विक्रीवर झालाच शिवाय जाहिरातींवरही झाला. पीसीबीने चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळविल्याने अब्जावधी कमविण्याची स्वप्ने पाहिली होती, म्हणून त्यांनी स्टेडिअम नव्याने बांधली होती. त्यावर करोडो रुपये खर्चही केले होते. आता जेव्हा त्यांनी सगळा हिशेब केला तेव्हा ८५ टक्के नुकसानच झाल्याचे समोर आले आहे.
टेलिग्राफनुसार पीसीबीने ८५१ कोटी रुपये खर्च केले होते, त्यापैकी त्यांना ५२ कोटी रुपयांचीच कमाई झाली आहे. जवळपास ७९९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा तोटा आता पाकिस्तान आपल्या खेळाडूंकडून वसुल करण्यास सुरुवात केली आहे, त्यांचे पैसे कापले आहेत. पाकिस्तानमधील सर्व सामने हे लाहोर, कराची आणि रावळपिंडीमध्ये झाले होते. तर भारताचे सर्व सामने दुबईत झाले होते. ही तीन स्टेडिअम दुरुस्त करण्यासाठी पाकिस्तानने ५०४ कोटी रुपये खर्च केले होते. तर टुर्नामेंटच्या तयारीसाठी ३४७ कोटी रुपये खर्च केले होते. यापैकी केवळ ५२ कोटीच पाकिस्तानला मिळविता आले आहेत. पाकिस्तानी संघही चांगला न खेळल्याचा परिणाम महसुलावर झाल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे.