पाकिस्तानी संघाचा जलदगती गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) हा अनेकदा वादामुळे चर्चेत राहतो. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत महागडे षटक, उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा सोडलेला कॅच यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. आता पुन्हा तो एका नव्या वादात अडकला आहे. पाकिस्तान सुपर लीग ( PSL)चा प्लेअर्स ड्राफ्ट काल पार पडला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हसन अलीनं एका पत्रकारासोबत हुज्जत घातली अन् त्याला धमकी दिली.
इस्लामाबाद युनायटेड फ्रँचायाझीच्या या गोलंदाजान हसन अलीनं पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली, परंतु एका पत्रकाराच्या प्रश्नावर त्यानं बोलणं टाळले. पत्रकारानं प्रश्न पूर्ण करण्याआधीच हसन अलीनं त्याला टोकलं अन् अन्य पत्रकारांना प्रश्न विचारण्यास सांगितले. त्याच्या या वागणुकीनं पत्रकार निराश झाला आणि हे वर्तन योग्य नव्हे असे म्हणाला. त्यानंतर हसन अलीचा पारा चढला आणि त्यानं उलट उत्तर दिले. त्याला फ्रँचायझी ओनर आवरू लागले.
पाकिस्तानी गोलंदाजानं पत्रकाराला आधी तू ट्विटरवर चांगल्या गोष्टी लिहायला लाग, त्यानंतर मी तुझ्या प्रश्नांची उत्तर देईन. तुला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची परवानगी दिलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) तुम्हाला अडवू शकत नाही, परंतु मी ते करू शकतो. किमान आमच्याकडे तो अधिकार आहे.
![]()
हसननं ज्या पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले त्याचं नाव अनस अईस असं सांगितलं जात आहे. त्यानं या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या हसन अलीवर टीका केली होती. त्यावेळी त्यानं हसन अलीचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर हसन अलीनंही उत्तर दिले होते.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ विकेट्स राखून पराभव केला होता. या सामन्यात हसन अलीने (Hasan Ali) मॅथ्यू वेडचा झेल सोडला आणि त्यानंतर वेडने सलग तीन चेंडूत षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यानंतर हसन अलीला ट्रोल केले गेले होते. हसन अलीनं त्याच्या चुकीबद्दल सोशल मीडियावरून माफी मागितली होती.
त्याने सोशल मीडियावर लिहिले होते की, 'मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्यावर खूप नाराज आहात, कारण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. परंतु माझ्यापेक्षा जास्त दुःखी क्वचितच कुणी असेल. माझ्याकडून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी नाराज होऊ नका. मला प्रत्येक स्तरावर देशाची सेवा करायची आहे. मी पुन्हा एकदा मेहनत करायला सुरुवात केली आहे. मी आणखी मजबूत होऊन तुमच्या समोर येईन. आपले सुंदर मेसेज आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मला याची खूप आवश्यकता होती.'