लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूड याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याची गुरुवारी घोषणा केली. यंदा प्रथमश्रेणी सत्राअखेर क्रिकेटला तो रामराम करणार आहे. २०१० मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा तो कर्णधार होता.
तीनदा अॅशेस विजेत्या संघाचा खेळाडू राहिलेल्या कॉलिंगवुडने इंग्लंडसाठी ६८ कसोटी, १९७ वन डे आणि ३६ टी-२० सामने खेळले आहेत. २२ वर्षांआधी त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कॉलिंगवुड म्हणाला,‘अनेकदा विचार केल्यानंतर मी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. हा भावनात्मक निर्णय आहे. या खेळाला सर्वस्व दिल्याचे समाधन असून एक दिवस निवृत्त व्हायचे होते. तो दिवस आला आहे.’ डरहम संघाचे चेअरमन इयॉन बोथम म्हणाले,‘ त्याचे यंदाच्या प्रथमश्रेणीत डरहमकडून खेळणे अभिमानास्पद आहे.’