Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक नंबर...! पॅट कमिन्सनं स्वत:च्या गोलंदाजीवर घेतलेला भन्नाट झेल बघाच (VIDEO)

हा कॅच क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम कॅच पैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:29 IST

Open in App

Pat Cummins Catch : ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हा गोलंदाजीशिवाय मोक्याच्या क्षणी उपयुक्त फलंदाजीमुळे अनेकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले आहे. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी सामन्यात त्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेतले आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कॅरिबियनमधील ग्रेनेडा येथील सेंट जॉर्जेस नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पॅट कमिन्स याने आपल्याच गोलंदाजीवर एक भन्नाट कॅच टिपला. हा कॅच क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम कॅच पैकी एक आहे. 

पॅट कमिन्सची कमाल, स्वत:च्या गोलंदाजीवर घेतला भन्नाट कॅच

पॅट कमिन्स याने दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करून दाखवत कॅरेबियन संघाला मोठा धक्का दिला. वेस्ट इंडिजच्या संघाच्या पहिल्या डावातील नवव्या षटकात तो गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या कीसी कार्टीला पॅटनं गुड लेंथवर चेंडू टाकला. हा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळताना कॅरेबियन फलंदाज चुकला. चेंडू बॅटची कड घेऊन पॅडवर आदळला अन् मग चेंडू हवेत उडाला. फॉलो-थ्रूमध्ये पॅट कमिन्सनं एका हातात भन्नाट कॅच पकडत कॅरेबियन फलंदाजाचा खेळ खल्लास केला.

'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'

वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५३ धावांत आटोपला

 ग्रेनाडाच्या मैदानातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात २८६ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २५३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे आघाडी, पण...

यजमान वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात ४५ धावांची आघाडी घेतली आहे. पण त्यांनी अवघ्या १२ धावांवर २ विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आघाडी असली तरी वेस्ट इंडिजला या सामन्यात कमबॅक करुन मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे.