Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांड्याला फलंदाजीत सुधारणेची गरज : कपिल

हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायला हवी, कारण अष्टपैलू म्हणून त्याचे ते मुख्य कौशल्य आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:40 IST

Open in App

मोनाको : हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायला हवी, कारण अष्टपैलू म्हणून त्याचे ते मुख्य कौशल्य आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने व्यक्त केले.पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये ९३ धावांची खेळी केली होती, पण त्यानंतर मात्र त्याला क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात वैयक्तिक अर्धशतक झळकावता आले नाही. कुठल्याही प्रतिभावान अष्टपैलूची तुलना कपिलसोबत करण्याचा एक प्रघात पडला आहे. पांड्याने कुठलेही दडपण न बाळगता खेळायला हवे, असे कपिलचे मत आहे. कपिल म्हणाला, ‘त्याने आपल्या खेळाची छाप सोडली आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे. कुणासोबत तुलना केली तर त्याच्यावर दडपण येईल. त्याने नैसर्गिक खेळ करावा आणि खेळाचा आनंद घ्यावा.’कपिलच्या मते प्रत्येक अष्टपैलूमध्ये दोनपैकी एक कौशल्य मजबूत असायला हवे आणि पांड्या प्रामुख्याने फलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. कपिल म्हणाला, ‘मी त्याला त्याच्या एका प्रतिभेच्या जोरावर संघात स्थान पक्के केलेले बघण्यास इच्छुक आहे. मग ती गोलंदाजी असो वा फलंदाजी. त्याला आपल्या फलंदाजीवर आणखी थोडी मेहनत घ्यावी लागेल. तो अष्टपैलू फलंदाज आहे. जर त्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी गोलंदाजी सोपी होईल. अष्टपैलूसोबत असेच घडते.’पांड्या सध्या युवा असून त्याच्याकडून फार अधिक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, असेही कपिल म्हणाला. पुढील वषी होणाºया विश्वकप स्पर्धेबाबत बोलताना कपिल म्हणाला, भारताला जेतेपद पटकावण्यासाठी विद्यमान कर्णधार विराट कोहलीची आक्रमकता आणि धोनीची शांतचित्त वृत्ती याची गरज भासेल. कपिल म्हणाला, ‘जर तुमच्याकडे असे संयोजन असेल तर त्यात काहीच वाईट नाही. कारण कुणी शांतचित्ताने खेळ समजणारी व्यक्ती आणि कुणी आक्रमक होऊन खेळणारी व्यक्ती संघात असणे आवश्यक असते.जर प्रत्येक खेळाडू आक्रमक झाला तर कठीण होते. त्याचप्रमाणे प्रत्येकजण शांतचित्त असेल तरी अडचण होते. त्यामुळे आपल्याकडे आक्रमक व शांतचित्त याचे योग्य संयोजन असेल तर संघाला मदत होते.’ (वृत्तसंस्था)>पांड्याकडे चांगला खेळाडू होण्याची योग्यता आहे. आपण त्याच्याकडून अल्पावधीतच मोठी अपेक्षा बाळगून आहोत. अष्टपैलू म्हणून त्याला यश मिळवण्यासाठी कसून मेहनत घ्यावी लागेल. - कपिलदेव

टॅग्स :क्रिकेटकपिल देव