दुबई - क्रिकेट सामन्यांदरम्यान क्रीडा वाहिन्यांवर चालणाऱ्या कार्यंक्रमांचे संचालन करणाऱ्या महिला अँकर त्यांचे सफाईदार वक्तृत्व आणि सौंदर्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानच्या युवा क्रिकेटपटूने चक्क एका महिला अँकरचा उल्लेख आंटी असा केला. श्रीलंकेविरुद्ध खेळताना पदार्पणातच शतक फटकावणाऱ्या इमाद उल हक याने एका महिला अँकरने केलेल्या कौतुकारवर हा तिरकस ड्राइव्ह मारला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा नातेवाईक असलेल्या इमाम उल हकने पदार्पणातच शतक ठोकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पदार्पणातच शतक ठोकल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. या २१ वर्षीय फलंदाजाचे कौतुक करणाऱ्यांमध्ये अर्थातच महिला चाहत्यांचे प्रमाण लक्षणीय होते. पीटीव्हीची आघाडीची महिला अँकर फझीला साबा इमाम हिचाही इमाम उल हकचे कौतुक करणाऱ्यांमध्ये समावेश होता. फझिलाने इमामचे कौतुक केल्यावर इमामनेही तिला प्रतिसाद देत धन्यवाद फझिला आंटी म्हणत तिचे आभार मानले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.
खुद्द फझिला हीसुद्धा इमामच्या या कृतीने अवाक् झाली. तिने हा प्रकार खेळीमोळीने घेत दोघांचाही फोटो अपलोड केला आणि आंटीकडून अभिनंदन असे ट्विट करत वेळ निभाऊन नेली.
इमाम उल हक याने पदार्पणातच केलेल्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिस-या लढतीत श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली होती. या लढतीत हसन अली याने ३४ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेला ४८.२ षटकांत २०८ धावांत गुंडाळले. श्रीलंकेकडून उपुल थरंगाने सर्वाधिक ८० चेंडूंत ६१ धावा केल्या. थिसारा परेराने ५ चौकारांसह ३८ आणि लाहिरू थिरिमन्ने याने २८ धावांचे योगदान दिले.
त्यानंतर इमाम उल हकच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत फक्त ३ फलंदाज गमावत सहज पूर्ण केले. इमान उल हक याने १२५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह १०० धावा केल्या. त्याने फखर जमान याच्या साथीने सलामीसाठी ७८, बाबर आझमच्या साथीने ५९ आणि महंमद हाफीज याच्या साथीने ५९ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा विजय सुकर केला. फखर जमान याने २९, बाबर आझमने ३० व मोहंमद हाफीजने नाबाद ३४ धावा केल्या.